
सहसंपादक : रामभाऊ भोयर
दरवर्षी निसर्गाच्या लहरीपणाचा फटका शेतकऱ्यांना बसत असून कधी कोरडा दुष्काळ तर कधी ओला दुष्काळ हा शेतकऱ्यांच्या नशिबालाच पुजलेला असून शेतकऱ्यांचा वाली मात्र कोणीच नसतो शेतकऱ्यांच्या शेतातील अतिवृष्टीमुळे व रोगांच्या प्रकोपामुळे तसेच झालेल्या अल्प उत्पादनाला ना भाव ना अतिवृष्टीची भरपाई त्यामुळे शेतकऱ्यांची दिवाळी अंधारात गेली आहे.
शासनाने अतिवृष्टीची रक्कम दिवाळीपूर्वी शेतकऱ्यांच्या खात्यात जमा केली जाईल असे सांगितले त्यासाठी कर्मचाऱ्यांना दिवाळीपूर्वी याद्या पूर्ण करण्यास धावपळ करावी लागली अखेर मात्र शासनाने अतिवृष्टीचे रक्कम शेतकऱ्यांना दिली नसल्याने शेतकऱ्यांची दिवाळी मात्र अंधारात गेली आहे. अतिवृष्टीची रक्कम शासनाने दिली नसल्याने शेतकऱ्यांनी शासनाविषयी रोष व्यक्त केला असून शेतकऱ्यांना होणाऱ्या जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणुकात विचार करावा लागणार आहे. यावर्षी झालेल्या अतिवृष्टीमुळे शेतातील मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून सोयाबीन उत्पादनात मोठी घट झाली आहे तर कपाशी पीक मोठ्या प्रमाणात वाढले असून कपाशीला नाममात्र बोंड असल्याने कपाशी उत्पादनातही मोठी घट येणार असल्याचे वर्तवले जात आहे. त्यातच गतवर्षीपेक्षा एक ते दीड हजारानी भावही पडले. मात्र, दुसरीकडे बाजारातील सर्व वस्तूंच्या किमती गतवर्षीपेक्षा १० ते १५ टक्क्यांनी वाढल्या आहेत. महागाई गगनाला भिडली असताना शेतमालाचे भाव भुईवर आल्याची विदारक परिस्थिती निर्माण झाली आहे.
अतिवृष्टीने शेतीमाल पाण्यात गेला. हाती लागलेल्या शेतीमालाला बाजारभाव नाही, मात्र महागाईवर शासनाचे नियंत्रण नाही. त्यामुळे व्यापाऱ्यांना सुरक्षा कवच दिले जाते, शेतकऱ्यांना वाऱ्यावर सोडले आहे राज्य सरकारने मोठा गाजावाजा करत शेतकऱ्यांना अतिवृष्टीचे रक्कम दिवाळीपूर्वी खात्यात जमा केली जाईल असे सांगितले परंतु दिवाळीपूर्वी शेतकऱ्यांच्या खात्यात एक फुटकी कवडी जमा न झाल्याने शेतकऱ्यांना दिवाळी सारखा सण साजरा करता आला नाही . त्यामुळे दिवाळीनंतर होणाऱ्या जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुकीत शेतकरी धडा शिकवल्याशिवाय राहणार नाही हे मात्र खरे
