
सहसंपादक: रामभाऊ भोयर
‘भराडी ‘हा शब्द महाराष्ट्रातील लोकजीवन , लोककलेशी साधर्म्य साधतो .जिल्ह्याच्या बोलीत मात्र तो बहुजनांच्या बाबतही कसा काय पण वापरात येतो. यात ‘ भराड्याला एक तर पैसा कमवता येत नाही कमावला तर टिकवता येत नाही आणि टिकवला तर पचवता येतं नाही ‘ अस सर्रास वापरल जाणार एक गृहितक आहे ,आणि ते मान्यते पर्यंत पोचण्याच्या मार्गावर आहे . या तुलनेत व्यापारी वर्ग मोठा हुशार असतो त्याला पैसा कमवता येतो ,टिकवता येतो पचवता तर येतोच त्या पुढे वाढवता सुद्धा येतो ,अशी ठाम धारणा इतर वर्गाची असते.राळेगाव शहरातील व्यापाऱ्याला 1 कोटी 37 लाख 64 हजाराचा गंडा क्रिप्टो करेंसीच्या भूलभुलैया ने लगावला आणि या धारणेला सर्वात मोठा हादरा बसला. आजच्या काळात आर्थिक साक्षरता किती गरजेची हा धडा देऊ पाहणारे हे प्रकरण सध्या चांगलेच चर्चेत आहे सोबतच ऑनलाईन फसवणुकीचे निरनिराळे फंडे कोणत्या टोकाला घेऊन जातात याची सार्वत्रिकता देखील या प्रकरणाने चव्हाट्यावर आणली आहे .
‘क्रिप्टो’ करन्सीच्या नाव भरघोस परतावा देण्याचे आमिष दाखवून तब्बल 1 कोटी 37 लाख 64 हजारांनी ऑनलाइन गंडा घातल्याचे हे प्रकरण राळेगाव येथे घडले .या प्रकरणी राळेगाव पोलिसांनी एका महिलेसह अज्ञात आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. मात्र, या प्रकारामुळे शहरात एकच खळबळ उडाली आहे.
मनिष कांतिलाल बोथरा (48) रा. माळीपुरा, राळेगाव असे फिर्यादीचे नाव आहे. ते राळेगाव येथील प्रतिष्ठीत व्यापारी आहेत. घटनेनंतर त्यांनी राळेगाव पोलीस ठाणे गाठून याप्रकरणी रितसर तक्रार दिली. त्यावरून 4नोव्हेंबर 2025 रोजी बोथरा यांच्या व्हॉट्सअॅपवर अंकिता अग्रवाल नामक एका महिलेचा कॉल आला तिने क्रिप्टो करन्सी आणि फॉरेक्स ट्रेडिंगमध्ये पैसे गुंतवणूक केल्यास मोठ्या प्रमाणात नफा मिळवून देण्याचे आमिष बोथरा यांना दाखविण्यात आले .या आर्थिक फसवणूक प्रकरणात बनावट ऍप चा वापर करून गुंतवलेली रक्कम अल्पावधीत मोठा परतावा देत असल्याचे हा ऍप दाखवत होता ,त्या सोबतच बोलण्यात पटाईत असणारी ही टीम विश्वास जिंकून नंतर आपला गेम दाखवत असल्याने अनेक जन यात अडकतात हा पूर्वानुभव राहिला आहे . जामतारा पॅटर्न आधी ऑनलाईन रक्कम पळविण्याचे कारनामे करायचा ,आता यात अनेक जन शिरले असून त्यांनी त्यांचा ट्रेंड बदलवला आहे किंवा त्याला शेअर मार्केट सारख्या आधुनिकतेची खोटी झालर लावून चकमकीत स्वरूपात पुढे आणले आहे .
‘ लोभाचे मूळ पाप ‘ अशीही एक वंदता आहे.अलीकडच्या काळात व्याजदर कमी होत असल्याने आर्थिक गुंतवणुकी करिता वेगवेगळे पर्याय पडताळून पाहिले जातात . शेअर मार्केट ,म्युचुअल फंड , क्रिप्टो करन्सी सारखे मार्ग सारेच वापरू लागले आहे .मात्र या विषयाचे ज्ञान व्हॉट्सअप , युट्यूब युनिव्हर्सिटी तून घेतल्या जाते .त्या साठी खऱ्या खोट्या ॲप चा वापर करण्याच्या गाईडलिन दिल्या जातात,याच आघाडीवर फसवणुकीकडे पहिले पाऊल पडते .राळेगाव येथे समोर आलेले प्रकरण 1कोटी 37 लाखाच्या पुढे आहे म्हणजे गंमत नाही ,ग्रामीण भागातील शेतकऱ्यांची मुले सुद्धा अर्धवट ज्ञानावर हा खेळ खेळू लागली आहे .शेतकऱ्यांची एकंदर परिस्थिती पाहता दहा वीस हजाराची फसवणूक देखील त्याच्या करिता जीवघेणी ठरू शकते . आणि ती होत देखील आहे ,पण चर्चा होते केवळ कोटीच्या फसवणुकीची .आपल्या कडे आर्थिक साक्षरता शिकविणारी जबाबदार व्यवस्थाच नाही ,जेव्हा की हा विषय सर्वात महत्वाचा आहे .पारलौकिक , आध्यात्मिक जीवनाचे शिक्षण आवश्यक वा अनावश्यक हा वेगळा मुद्दा असेल पण या आघाडीवर अनेक बुवा,बापू इथे दिसतील पण आर्थिक साक्षरता शिकविणारी प्रणाली कुठेच नाही .सोशल मिडिया हा जबाबदार पर्याय होऊ शकत नाही .या प्रकरणातून शेतकऱ्यांच्या मुलानी हा भूलभुलैया समजून घेणे हा धडा शिकण्याची नितांत गरज अधोरेखित होते .
करोडो रुपयाच्या फसवणुकीच्या या प्रकरणाचा तपास जिल्हा पोलिस दलाने आपल्या अखत्यारीत घेतला हे एक बरे झाले .राळेगाव पोलिस प्रशासन तर सध्या ‘आने दो और जाणे दो ‘ वाल्या चौकटीतच गुरफटून गेले आहे . अवैध रेती ,अवैध दारू विक्री ,मोबाईल चोऱ्या , घरफोड्या या साऱ्यांना इथे सुगीचे दिवस आलेत .गेल्या काही दिवसातील सर्व आघाड्यांवर अपयशी ठरणारा विभाग कोणता तर तो पोलिस विभाग असे उत्तर यावे असा विक्रम प्रस्थापित करण्याच्या मार्गावर हा विभाग वेगाने मार्गक्रमण करतांना जाणवतो . मोबाईल चोरट्यांना राळेगाव पोलिस या करिता पकडत नाही कारण लोकांकडे मोबाईलचं राहणार नाही तर मोबाईल वरून पैसे फसवणूक करण्याची संधीच कुणाला मिळणार नाही .असा मानवाईक विचार या विभागाचा असल्याची प्रतिक्रिया खूप काही सांगून जाते .
