
प्रतिनिधी: शेख रमजान
पोलिसांच्या आपत्कालीन ‘डायल ११२’ क्रमांकावर मारहाणीचा खोटा कॉल करून प्रशासकीय यंत्रणेची दिशाभूल करणाऱ्या रघुनाथ दत्ता माणिकवाड (वय २८, रा. करंजी, ता. उमरखेड) या तरुणाविरुद्ध बिटरगाव पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.
दिनांक २३ फेब्रुवारी २०२६ रोजी सायंकाळी ७:३० च्या सुमारास आरोपीने आपल्याला ८ ते १० जणांनी मारहाण केल्याची खोटी माहिती नियंत्रण कक्षाला दिली होती. घटनेचे गांभीर्य ओळखून ठाणेदार पांडुरंग शिंदे यांनी तातडीने पोलिसांचे पथक करंजी येथे पाठवले. मात्र, घटनास्थळी चौकशी केली असता असा कोणताही प्रकार घडला नसल्याचे समोर आले आणि कॉलरने आपला फोनही बंद करून टाकला होता.
पोलिसांचे मनुष्यबळ, वेळ आणि शासकीय साधनसामग्रीचा अपव्यय केल्याप्रकरणी आरोपीविरुद्ध भारतीय न्याय संहिता (BNS) कलम २१७, २२१ नुसार गुन्हा नोंदवण्यात आला आहे. नागरिकांनी आपत्कालीन सेवेचा गैरवापर करू नये, अन्यथा कठोर कारवाई केली जाईल, असा इशारा बिटरगाव स्टेशन ठाणेदार पांडुरंग शिंदे यांनी दिला आहे.
