
सहसंपादक : रामभाऊ भोयर
राळेगाव शहरातील वार्ड क्रमांक 12, क्रांतीसुर्य महामानव बिरसा मुंडा चौक येथून जाणाऱ्या मुख्य रस्त्यावर असलेल्या पुलाजवळ गेल्या पंधरा दिवसांपासून मोठा खड्डा पडून सार्वजनिक वाहतुकीस मोठा धोका निर्माण झाला आहे. दिवाळीसारख्या सणासुदीच्या काळात या खड्ड्यामुळे किरकोळ अपघातही झाल्याची माहिती स्थानिक नागरिकांनी दिली.
चार ते पाच वार्डांना जोडणारा हा मुख्य मार्ग असल्याने मोठ्या प्रमाणात वाहतूक या रस्त्याने होते. वारंवार सूचना करूनही नगरसेवकांनी ना पाठपुरावा केला ना नगरपंचायतीकडे तक्रार नोंदविली, अशी नाराजी नागरिकांनी व्यक्त केली.
नगरसेवकांच्या अकार्यक्षमतेमुळे या वार्डातील नागरिक त्रस्त झाल्याचेही नागरिकांनी सांगितले.
यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी (शरदचंद्र पवार गट) तालुकाध्यक्ष दिलीप कन्नाके यांच्यासह नागरिक उपस्थित होते. सर्व नागरिकांच्या वतीने करण्यात आलेल्या सामूहिक विनंतीतून राळेगाव नगरपंचायतीचे मुख्याधिकारी यांनी तातडीने या खड्ड्याची दुरुस्ती करून मोठा अपघात टाळण्यासाठी आवश्यक उपाययोजना कराव्यात, अशी मागणी करण्यात आली आहे.
