
सहसंपादक : रामभाऊ भोयर
महाराष्ट्रातील बलाढ्य व प्रभावी अशी ओळख असलेल्या विदर्भ माध्यमिक शिक्षक संघाने २०२६ मधील अमरावती विभाग शिक्षक मतदार संघ निवडणुकीसाठी आपला अधिकृत उमेदवार जाहीर केला आहे. संघटनेच्या उपविधीनुसार रविवारी (ता.२६) अकोला विश्रामगृह येथे पार पडलेल्या निवडणुकीत दिलीप कडू यांची एकमताने अधिकृत उमेदवार म्हणून घोषणा करण्यात आली. माजी आमदार व्ही. यू. डायगव्हाणे व आमदार सुधाकर अडबाले यांच्या उपस्थितीत ही प्रक्रिया संपन्न झाली.
बैठकीत शिक्षकांचे प्रलंबित प्रश्न, पुढील निवडणुकीची रणनीती आदी मुद्यांवर सविस्तर चर्चा झाली. उमेदवारीची घोषणा होताच संघटनांमध्ये उत्साहाचे वातावरण पसरले असून निवडणूक तयारीला गती मिळाली आहे. विशेष म्हणजे, महाराष्ट्र राज्य आय. टी. आय. निदेशक संघटनेने दिलीप कडू यांना जाहीर पाठिंबा दर्शवत निवडणुकीत सक्रिय सहभागाची घोषणा केली.
निवडणूक अधिकारी म्हणून रवींद्र वाघमारे तर सहायक निवडणूक अधिकारी म्हणून पांडुरंग भालशंकर यांनी कार्यभार सांभाळला. बैठकीस विमाशि संघाचे प्रांतीय अध्यक्ष अरविंद देशमुख, उपाध्यक्ष विजय ठोकळ, जयदीप सोनखासकर, रमेश काकडे, जयप्रकाश थोटे, विभागीय कार्यवाह बाळासाहेब गोटे, कोषाध्यक्ष भूषण तल्हार, जिल्हा अध्यक्ष पवन बन, जिल्हा कार्यवाह रामकृष्ण जिवतोडे, उपाध्यक्ष श्रावनसिंग वडते, किशोर बोढे,अरूण गारघाटे तसेच विविध मान्यवर, आय.टी.आय. संघटनेचे पदाधिकारी व शिक्षक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
🔸कडू शिक्षकांसाठी समर्पित कार्य करतील — आ. अडबाले
दिलीप कडू हे शिक्षण क्षेत्रातील अनुभवी व प्रामाणिक नेतृत्व असून त्यांनी सातत्याने शिक्षक हक्कांसाठी भूमिका घेतली आहे. पूर्वीही विदर्भ माध्यमिक शिक्षक संघाच्या माध्यमातून त्यांनी अनेक प्रश्न यशस्वीपणे मांडले, असे गौरवोद्गार सरकार्यवाह तथा आमदार सुधाकर अडबाले यांनी काढले. अमरावती विभागातील सर्व जिल्ह्यात मतदार नोंदणी व प्रचार मोहीम व्यापक स्तरावर राबविण्यात येईल, अशी माहितीही यावेळी देण्यात आली.
