
सहसंपादक : — रामभाऊ भोयर
राळेगाव तालुक्यातील झाडगाव येथील नेहमी सामाजिक कार्यात अग्रेसर असलेले संत गजानन महाराज मंडळ यांनी याही वर्षी सामाजिक जाणीवेचा उत्तम नमुना दाखवला आहे. मागील वर्षाप्रमाणे यंदाही काकड आरती समाप्तीनंतर महाप्रसादातील उर्वरित धान्याचा उपयोग करत मंडळाने कळंब येथील धोत्रा परिसरातील सुरेंद्र रुद्राक्षवार यांच्या “माऊली वृद्धाश्रमात” जाऊन वृद्धांना भोजन प्रसाद दिला.
फक्त प्रसादच नव्हे, तर प्रत्येक वृद्ध व्यक्तींचे मंडळाच्या कार्यकर्त्यांनी पाय धुवून पूजन केले आणि त्यांना नारळ-पान अर्पण करून सन्मानित केले. तसेच सुमारे १७ वृद्ध महिला व पुरुषांना टॉवेल पीस देण्यात आले.
राळेगाव येथील विजयाताई ढगे यांनी सर्व गरजू वृद्धांना पादत्राणे दिली, तर झाडगाव येथील शुभांगी दिगंबर केवटे यांनी आपल्या वाढदिवसानिमित्त वृद्धाश्रमाला आर्थिक मदत तसेच फुलांचा गुच्छ अर्पण केला.
याशिवाय झाडगावचेच देवांश नारायण कुटे यांनी वृद्धाश्रमातील रहिवाशांना फळवाटप केले.
आजच्या काळात वृद्धाश्रम ही समाजाची अपरिहार्य गरज बनली आहे. ज्या वृद्धांना अपत्य नाही, नातेवाईकांची साथ नाही किंवा घरात राहणे शक्य नाही, अशा अनेकांसाठी वृद्धाश्रम हेच सुरक्षित आश्रयस्थान ठरते.
ज्यांनी आपल्या आयुष्यभर मुलांसाठी श्रम केले, त्यांच्याकडे दुर्लक्ष होणे ही समाजासाठी धोक्याची घंटा आहे. प्रत्येक मुलाने आपल्या आईवडिलांचा सांभाळ करणे ही जबाबदारी म्हणून स्वीकारली पाहिजे. तसेच वाढदिवस, उत्सव किंवा कोणत्याही प्रसंगी समाजातील दानशूर व्यक्तींनी अशा कार्यात सहकार्य करावे, असे आवाहन मंडळाच्या वतीने करण्यात आले.
