कृषी सहायक उंटावर बसून शेळ्या हाकलत असल्याचा सावरखेडा येथील शेतकऱ्यांचा आरोप ग्रामपंचायतीपुरताच मर्यादित;
सहसंपादक : रामभाऊ भोयर
राळेगाव तालुक्यातील सावरखेडा येथील कृषी सहायकांचे शेतकऱ्यांकडे दुर्लक्ष सविस्तर वृत्त असे गावातील शेतकऱ्यांना आधुनिक शेती तंत्रज्ञान, हवामान बदल, बियाणे निवड, आणि खत व्यवस्थापनाविषयी सबंधित कृषी मंडळ अधिकारी व कृषी सहाय्यक यांचे मार्गदर्शन मिळावे यासाठी शासनाकडून कृषी सेवकांची नियुक्ती करण्यात आलेली असते. मात्र प्रत्यक्ष पाहता गावातील कृषी सेवक तसेच कृषी मंडळ अधिकारी फक्त नावालाच गावात दिसतो. तर कृषी सहाय्यक हा काही वेळा ग्रामपंचायत मध्ये हजेरी लावून जात असल्याची ओरड येथील शेतकऱ्यांमध्ये सुरू आहे तर प्रत्यक्ष शेतात किंवा शेतकऱ्यांमध्ये उतरून कोणतीही मोहीम, जनजागृती किंवा मार्गदर्शन कृषी सहाय्यकानी व कृषी मंडळ अधिकाऱ्यांनी असे कोणतेही कार्यक्रम राबविण्यात आलेले नाही.गावात अनेक शेतकरी दरवर्षी हवामानातील अनिश्चितता, बियाण्यांची अडचण, कीडनाशकांचा चुकीचा वापर, आणि पिकांचे नुकसान या समस्यांनी त्रस्त आहेत. अशावेळी कृषी सेवकांकडून प्रत्यक्ष सल्ला, मार्गदर्शन आणि प्रशिक्षण मिळणे अत्यावश्यक आहे. मात्र गेल्या काही महिन्यांपासून या ठिकाणी कोणतीही कृषी मोहिम, शेतकरी सभा, कीडनियंत्रण जनजागृती किंवा खत व्यवस्थापनाबाबत मार्गदर्शन झालेले नाही.शेतकऱ्यांच्या म्हणण्यानुसार, “कृषी सेवक तसेच कृषी मंडळ अधिकारी फक्त नावालाच गावात येतो, पण शेतात येऊन कोणताही सल्ला शेतकऱ्यांना देत नाही. अधिकारी फक्त कागदोपत्री काम दाखवतात, प्रत्यक्ष काहीच घडत नाही.” अशी नाराजी शेतकरी वर्गातून व्यक्त होत आहे.यामुळे गावातील शेतकऱ्यांमध्ये नाराजीचे वातावरण निर्माण झाले असून कृषी विभागाच्या कार्यपद्धतीबद्दल प्रश्नचिन्ह उभे राहिले आहे. शेतकऱ्यांना प्रत्यक्ष लाभ मिळवून देण्यासाठी शासनाचे विविध उपक्रम राबवले जात असले तरी गावपातळीवर त्याचा काहीच परिणाम दिसून येत नाही.स्थानिक शेतकरी व ग्रामस्थांनी प्रशासनाकडे मागणी केली आहे की, संबंधित कृषी मंडळ अधिकारी तसेच कृषी सेवकाने गावात नियमितपणे भेटी द्याव्यात, शेतकऱ्यांशी संवाद साधावा आणि जनजागृती उपक्रम राबवावेत. अन्यथा उच्चस्तरीय चौकशी करून निष्क्रिय अधिकारी व कर्मचाऱ्यांवर कार्यवाही करण्यात यावी अशी मागणी येथील शेतकरी वर्गाकडून होताना दिसत आहे .
