
सहसंपादक : रामभाऊ भोयर
नगरपरिषद, नगरपंचायत तसेच पंचायत समिती व जिल्हा परिषद निवडणुकीची धामधूम सुरू असताना कोसारा घाट परिसरात वाळू तस्करांनी केलेल्या धाडसी हल्ल्याने मारेगाव तालुका हादरला आहे. आज सकाळी अवैधरित्या वाळू वाहतूक सुरू असल्याची माहिती मिळताच कोतवाल आणि पोलीस पाटील तातडीने घटनास्थळी पोहोचले. मात्र आपला गैरप्रकार उघडकीस आल्याचे लक्षात येताच तस्करांनी प्रशासनालाच लक्ष्य करत ट्रॅक्टर चढवून जीव घेण्याचा प्रयत्न केल्याची धक्कादायक घटना घडली.
हल्ल्यात कोसारा येथील पोलीस पाटील गाणार गंभीर जखमी झाले असून कोतवाल पचारे यांच्या हाताला फ्रॅक्चर झाल्याचे समजते. दोघांवरही वणी येथे उपचार सुरू आहेत. यात त्यांच्या दुचाकीचा पुढील भाग अक्षरशः चकणाचूर झाला आहे.
ग्रामपातळीवरील कायद्याचे रक्षण करणाऱ्या कर्मचाऱ्यांवरच असा संतापजनक हल्ला झाल्याने तालुक्यात मोठी खळबळ उडाली आहे. वाळू माफियांचा वाढता धाडस प्रशासनासाठीही गंभीर चिंतेचा विषय बनला आहे. घटनेनंतर कोतवाल व पोलीस पाटील संताप व्यक्त करत या अमानुष हल्ल्याचा निषेध नोंदवण्यासाठी तालुका प्रशासनाकडे निवेदन देण्याच्या तयारीत आहेत.
वृत्त पाठवतानाच ठाण्यात तक्रार दाखल करण्याची प्रक्रिया सुरू असल्याची माहिती मिळाली. दरम्यान, वाढत्या वाळू तस्करीमुळे नागरिकांमध्ये अस्वस्थता पसरली असून, “या प्रकरणातील आरोपींवर कडक कारवाई होणार की नाही?” याकडे आता संपूर्ण तालुक्याचे लक्ष लागले आहे.
