
पोंभूर्णा तालुका प्रतीनीधी:- आशिष नैताम
पोंभूर्णा:- शासन स्तरावरून अवैध रेती उत्खनन आणि वाहतुकीवर अनेक कारवाया केल्या जात असल्याचे सांगितले जात असले तरी, तालुक्यात मोठ्या प्रमाणावर रेती माफियांची मुजोरी सुरू आहे. पोंभुर्णा तालुक्यात दिवस-रात्र सुरू असलेल्या अवैध रेती वाहतुकीवर अद्यापही प्रभावी नियंत्रण मिळवले गेलेले नाही. महसूल विभागाने अवैध रेती वाहतूकी विरोधात जाहीर केलेल्या धोरणांची अंमलबजावणी प्रशासन स्तरावर अडकून पडली आहे. शासन स्तरावरून अवैध रेती उत्खनन आणि वाहतुकीवर अनेक कारवाया केल्या जात असल्याचे सांगितले जात असले तरी, तालुक्यात मोठ्या प्रमाणावर रेती माफियांची मुजोरी सुरू आहे.
तालुक्यात खुलेआम अवैध वाहतूक
चंद्रपूर जिल्ह्यात असा एकही तालुका नाही, जिथे अवैध रेती वाहतूक सुरू नाही. दिवस-रात्र रेती वाहतूक सुरू असल्याने रेती माफियांचे जिल्ह्यात बळकट जाळे तयार झाले आहे. महसूल विभागाने मागील वर्षभरात अनेक घटनांमध्ये कारवाई करत तब्बल चार कोटी रुपयांहून अधिक दंडाची रक्कम वसूल केली आहे. मात्र, यानंतरही अवैध वाहतूक सुरूच असल्याचे दिसून येत आहे.
महसूल अधिकाऱ्यांवर हल्ल्याचे प्रकार वाढले –
अवैध रेती वाहतूक करताना महसूल विभागाच्या अधिकाऱ्यांवर जीवघेणे हल्ले करण्याच्या अनेक घटना घडल्या आहेत. या हल्ल्यांमध्ये तलाठी, मंडळ अधिकारी आणि निवासी तहसीलदार यांच्यावर प्राणघातक हल्ले झाले आहेत. महसूल विभागाच्या कारवाईला जाणीवपूर्वक विरोध करत माफियांनी प्रशासनावर दहशतीचे वातावरण निर्माण केले आहे.
अपघात आणि शेतकऱ्यांचे नुकसान-
रेती वाहतूक करणाऱ्या डंपरच्या धडकेत आतापर्यंत दोन ते तिन नागरिकांचा मृत्यू झाला आहे, तर अनेक जण गंभीर जखमी झाले आहेत. अवैध रेती वाहतूक करताना शेतकऱ्यांच्या शेतात घुसून उभी पिके तुडवली जात आहेत. तसेच, शेतकऱ्यांना धमक्या देऊन दहशत माजवली जात असल्यामुळे शेतकऱ्यांमध्ये मोठा रोष आहे.
कठोर कारवाईची मागणी-
महाराष्ट्र नवनिर्माण सेना पोंभुर्णा चे शहर अध्यक्ष श्री.निखिलभाऊ कन्नाके यांनी अवैध रेती वाहतुकीवर तातडीने कठोर कारवाईची मागणी केली आहे. महसूल विभागावर हल्ले होण्याच्या घटना लक्षात घेता, अधिकाऱ्यांच्या सुरक्षेसाठी अतिरिक्त पोलीस बंदोबस्त तैनात करण्याचीही मागणी केली आहे. प्रशासनाने रेती माफियांवर कठोर कारवाई करून अवैध रेती वाहतूक थांबवावी, अन्यथा महाराष्ट्र नवनिर्माण सेना, पोंभुर्णा तालुक्यातील नागरिक आणि शेतकऱ्यांना घेऊन मनसे स्टाईल आंदोलन करणार, असा थेट इशारा देण्यात आलेला आहे.
सदर निवेदन देताना, मनसे तालुकाध्यक्ष श्री. आकाश भाऊ तिरुपत्तीवार, मानविसे तालुकाध्यक्ष श्री. आशिष भाऊ नैताम, मनसे शहर उपाध्यक्ष हेमंत उराडे, तालुका उपाध्यक्ष राजेश गेडाम, गुरुदेव बुरांडे, आनंद विरुटकर, अनिकेत कोंडावर, आदी मनसैनिक उपस्थित होते.
