
सहसंपादक : रामभाऊ भोयर
कळंब: तालुक्यातील मार्कडा येथे एका १८ वर्षीय युवकाचा वीज प्रवाहामुळे दुर्दैवी मृत्यू झाल्याची हृदय पिळवटून टाकणारी घटना रविवार, २३ नोव्हेंबर रोजी दुपारी १२.०० च्या सुमारास उघडकीस आली.
साहिल दिलीप चव्हाण (वय १८, रा. मार्कडा, ता. कळंब) असे मृत्यू झालेल्या विद्यार्थ्याचे नाव आहे. मोहदा येथील शिवाजी विद्यालयात बारावीत शिकणारा साहिल, रविवारची सुट्टी असल्याने वडिलांना शेतीत पाणी देण्यासाठी (ओलीत) मदत करायला गेला होता.
मिळालेल्या माहितीनुसार, दिवसभर वीजपुरवठा असल्याने साहिल वडिलांसोबत मोटार सुरू करण्यासाठी गेला होता. असोली शिवारातील शेत सर्व्हे नं. ९७/१किरण मडावी यांचे जवळून भाडेतत्त्वावर घेतलेल्या शेतात, मोटारीजवळ विद्युत प्रवाह चालू असताना, अतिशय दुर्दैवाने साहिलला वीजेच्या तारेचा स्पर्श झाला. वीजेचा तीव्र धक्का लागल्याने साहिल जागीच बेशुद्ध पडला.
वडिलांनी तातडीने आरडाओरड करत आणि जीवावर उदार होऊन साहिलला प्रवाहापासून दूर केले. त्याला तात्काळ प्राथमिक आरोग्य केंद्र मेटीखेडा येथे आणि नंतर अधिक उपचारासाठी वसंतराव नाईक शासकीय रुग्णालय यवतमाळ येथे हलवण्यात आले. परंतु, वीजेचा प्रवाह जबर असल्याने डॉक्टरांनी साहिलला मृत घोषित केले.
आई, वडील आणि दोन बहिणी असा परिवार असलेल्या या होतकरू विद्यार्थ्याच्या अकाली जाण्याने मार्कडा गावावर आणि चव्हाण कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.
