
सहसंपादक : रामभाऊ भोयर
शासनाने २०२४ पर्यंत प्रत्येक नागरिकाला हक्काचे घर मिळावे, या उद्देशाने विविध योजनांच्या माध्यमातून घरकुल मंजूर केली आहेत. मात्र रेतीचे वाढते दर पाहता घर बांधकाम करणे घरकुल लाभार्थ्यांसाठी कठीण झाले आहे. त्यामुळे शासनाने घरकुल लाभार्थ्यांना स्वस्त दरात रेती व मुरूम उपलब्ध करून द्यावे, या मागणीचे निवेदन धानोरा येथील घरकुल लाभार्थी, सरपंच, उपसरपंच व ग्रामपंचायत सदस्यांच्या वतीने तहसीलदारांना देण्यात आले.
धानोरा गावात सुमारे १०० नवीन घरकुल लाभार्थी आहेत. घर बांधकामासाठी लागणारी रेती गावाजवळ उपलब्ध असूनही ती ६,००० ते ७,००० रुपये प्रति ब्रास दराने खरेदी करावी लागत आहे. शासनाने घरकुल लाभार्थ्यांना पाच ब्रास रेती मोफत देण्याची घोषणा केली असली, तरी ही घोषणा प्रत्यक्षात केवळ कागदावरच राहिल्याचे चित्र आहे.
घरकुल लाभार्थी मोफत रेती मिळण्याची प्रतीक्षा करत असतानाच, कमी दरातसुद्धा रेती उपलब्ध होत नसल्याने घर बांधकामाचा खर्च मोठ्या प्रमाणात वाढत आहे. रेती व मुरूमच्या वाढत्या दरांमुळे अनेक लाभार्थ्यांचे घरकुलाचे काम रखडले आहे.
शासनाने घरकुल लाभार्थ्यांना स्वस्त दरात रेती उपलब्ध करून दिल्यास खर्चात बचत होऊन घर बांधकाम वेळेत पूर्ण करता येईल. यासाठी संबंधित महसूल विभागाने रेती विक्रेत्यांवर नियंत्रण ठेवून घरकुल लाभार्थ्यांना कमी दरात रेती उपलब्ध करून द्यावी व त्यांना दिलासा द्यावा, अशी मागणी या निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.
यावेळी उपसरपंच विशाल येणोरकर, स्वप्नील गलाट, प्रीतम घिनमीने, विजय मेश्राम, भोजराज जुनघरे, सुनील गेडाम, तुळशीराम गेडाम, आकाश सलाम, विजय चकोले, अविनाश घोडे, मनोहर देवतले, हर्षल घोडे, राजू गुजरकर, जीवन जुमनाके, निलेश वरघणे यांच्यासह अनेक घरकुल लाभार्थी उपस्थित होते.
