गोलबाजारात पुन्हा आगीचे तांडव ? – मध्यरात्री लावण्यात आली दुकानांना आग

प्रतिनिधी:उर्मिला पोहिनकर,चंद्रपूर

मध्यरात्री 2 वाजताच्या सुमारास लागलेल्या आगीत दुकानांचे जवळपास 5 लाखांच्यावर नुकसान झाले असुन ही घटना चंद्रपूरच्या मध्यवर्ती भागात असलेल्या गोल बाजारातील हनुमान चाळीत रविंद्र व उमेश वानखेडे यांचे चहाचे दुकान तसेच पुजा साहित्य व नारळाचे दुकान असुन ह्या आगीत दोन्ही दुकाने जळून खाक झाल्याची घटना घडली आहे.

चंद्रपूरच्या मध्यस्थानी असलेल्या गोल बाजारात मध्यरात्री 2 च्या दरम्यान काही अज्ञात व्यक्तींनी वानखेडे यांच्या चहाच्या दुकानाला आग लावल्याचा संशय व्यक्त केल्या जात असुन यात त्यांचे चहा तसेच पूजेच्या साहित्याचे दुकान जळून खाक झाले आहे. ही आग इतकी भीषण होती की यात दुकानाचे लोखंडी शटरसुद्धा उष्णतेमुळे वाकून गेले. जवळपास दोन तास पेटत असल्याचे प्रत्यक्षदर्शीने सांगितले आहे.

गस्तीवर असलेल्या पोलीस पथकाला रात्री 2 च्या सुमारास दुकान जळत असल्याची बाब लक्षात येताच दुकान मालक व अग्नीशमन विभागाला कळविण्यात आले. त्याचप्रमाणे महावितरण विभागालासुद्धा पाचारण करण्यात आले. परंतु आग इतकी भीषण होती की 2 तास पर्यंत दुकाने जळत होती.

गोल बाजार परिसरात नेहमीच आगीचा खेळ होत असतो. काही महिन्यांपूर्वी एका फळांच्या दुकानातही अशीच आग लावण्यात आली होती. त्या प्रकरणातील आरोपी अजुनही गवसले नसुन आता वानखेडे यांच्या दुकानाला लागलेल्या आगीमुळे परिसरातील दुकानदारांमधे असुरक्षेचे वातावरण निर्माण झाले आहे.

दुकानदारांच्या मालमत्तेचे मोठे नुकसान होत असल्याने पोलीस विभागाने दुकानांना आग लावणार्‍या समाज कंटकांचा तात्काळ शोध घेण्याची मागणी होत असुन नुकसानग्रस्त दुकानदारांना मदत मिळावी अशीही मागणी जोर धरत आहे.