
मराठी भाषा गौरव दिन
शिक्षण विभाग, पं.स.काटोल चा उपक्रम

प्रतिनिधी:ऋषभ जवंजाळ,काटोल
काटोल – दि.२७फेब्रुवारी
मराठी भाषा आपली अस्मिता आहे.हजार वर्षाचा इतिहास मराठी भाषेला लाभला आहे.स्पर्धेत ठिकण्यासाठी इतर भाषा नक्कीच आत्मसात कराव्यात, मात्र माय मराठीला विसरू नये.मराठी भाषेचे संवर्धन करण्याची जबाबदारी आपली सर्वांची आहे, असे प्रतिपादन कवी व साहित्यिक डॉ.मनोहर नरांजे यांनी केले.
मराठी भाषा दिनाचे औचित्य साधून गटशिक्षणाधिकारी दिनेश धवड यांच्या संकल्पनेतून शिक्षण विभाग,पं.स.काटोल तर्फे तालुक्यातील सर्व शिक्षकांकरिता ”मी व मराठी भाषा संवर्धन” या विषयावर ऑनलाइन चर्चासत्र आयोजित करण्यात आले होते.
मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळण्यासाठी मागील अनेक वर्षांपासून प्रयत्न सुरू आहे.अभिजात भाषेचे सर्व निकष पूर्ण करूनही दर्जा मिळत नाही.यात राजकीय इच्छाशक्तीचा अभाव दिसून येतो.मराठी भाषेवर होत असलेले हल्ले रोखण्यासाठी प्रत्येकाने प्रयत्न करावे असे भाष्य डॉ.मनोहर नरांजे यांनी केले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक शिक्षण विस्तार अधिकारी संतोष सोनटक्के , संचालन राजेंद्र टेकाडे तर आभार प्रदर्शन वनिताताई गोरे यांनी केले.कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी निलेश वाघ, घनश्याम भडांगे, धनंजय पकडे,विलास काळमेघ, मोरेश्वर साबळे, निलेश पोपटकर, रमेश गौरखेडे, मारोती मुरके, एकनाथ खजुरीया आदींनी सहकार्य केले.
