
प्रतिनिधी:उर्मिला पोहीनकर, चंद्रपूर
चंद्रपूर : रेमडेसीवीर इंजेक्शनची काळाबाजारी करणा-या पाच जणांना काल 7 मे रोजी चंद्रपुरात अटक करण्यात आली आहे. 25 हजार रुपये प्रमाणे हे आरोपी इंजेक्शनची विक्री करीत होते.
शहरात शुक्रवारी दुपारीच झालेल्या रेमडेसिव्हिर काळाबाजार धाड प्रकरणाच्या पोलिस तपासात धक्कादायक माहिती पुढे आली आहे. शहरातील क्राईस्ट रुग्णालयातील अतिदक्षता विभागाचे प्रभारी डॉक्टर जावेद सिद्दीकी यांना काळाबाजाराप्रकरणी रात्री अटक करण्यात आली आहे. क्राईस्ट रुग्णालयातील या गैरप्रकारात डॉक्टरला मदत करणाऱ्या 2 नर्सेसला देखील पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. क्राईस्ट रुग्णालयाला शहरातील मुख्य शासकीय कोविड केंद्राएवढेच महत्व आहे. इथली खाटांची आणि उपचाराची क्षमता लक्षात घेता हे केंद्र कोविड उपचारात मोठे योगदान देत आहे.
काल शुक्रवारी रात्री अन्न व औषध प्रशासन पथकाने एका गुप्त माहितीच्या आधारे गांधी चौक या गजबजलेल्या भागात रेमडेसिव्हीर विक्रेता आणि खरेदीदार या दोघांना धाड घालून ताब्यात घेतले होते. गुन्हा नोंद करून हा तपास शहर पोलिस ठाण्याला सोपविण्यात आला होता. त्यानुसार माघ काढत पोलिस क्राईस्ट रुग्णालयापर्यंत पोहोचले.
आता या प्रकरणात एकूण 5 जणांना अटक करण्यात आली आहे. जिल्ह्यात होत असलेल्या रेमडेसिव्हिर काळाबाजाराचे हे धक्कादायक वास्तव आहे. या रुग्णालयाला वितरित होणारे इंजेक्शन इथली टोळी जास्त किंमतीत बाहेर विकत असल्याचा खुलासा झाला आहे. या टोळीने किती इंजेक्शन अशारीतीने बाहेर विकले, याची सत्यता पोलिस चौकशीत कळणार आहे. रेमडेसिव्हिर काळाबाजाराची ही साखळी कुठवर जाते, याकडे जिल्ह्याचे लक्ष लागले आहे .
