कोव्हिडमधून बरे झाल्यानंतरही सुरक्षेची काळजी घ्यावी.तहसीलदार डॉ.रविंद्र कानडजे.


राळेगाव तालुका प्रतिनिधी:- रामभाऊ भोयर (9529256225)


कोरोनाच्या दुस-या लाटेमध्ये नागरिकांमध्ये खूप भीतीचे वातावरण पसरले आहे तर दुसरीकडे व्यवस्थेवरचा ताण वाढत असतांनाच रुग्णांचा जीव वाचविण्यासाठी आरोग्य विभागाची धडपड सुरू आहे. अशा स्थितीमध्ये प्रत्येक जण आता सुरक्षेबाबत सजग झालेला आहे. आता कोरोना पाठोपाठ इतर आजारांचा शिरकाव होत आहे. याला कोरोनामधून बरे झालेले रुग्ण जास्त प्रमाणात बळी पडत आहेत. त्यामुळे या संकटाला थोपवून लावण्यासाठी अधिक सजग राहण्याची गरज आहे. कोरोनामधून बरे झालेल्या रुग्णाने मास्क लावणे बंधनकारक आहे. घराबाहेर वा जिथे गर्दी होत असेल अशा ठिकाणी किमान काही महिने जाणे टाळणे गरजेचे आहे. एकूणच कोव्हिडमधून बरे झाल्यानंतर प्रत्येक रुग्णाने सुरक्षेची सर्व काळजी घ्यावी असे आवाहन राळेगांवचे तहसीलदार डॉ.रविंद्र कानडजे यांनी केले आहे.
कोरोनामध्ये रुग्णाला रुग्णालयात दाखल करावे लागल्यानंतर त्यामध्ये त्याच्यावर अनेक औषधांचा उपचार केला जातो. जीव वाचविण्यासाठी अनेक ‘हेवी डोज’ सुद्धा द्यावे लागतात. त्याचा प्रभाव प्रतिकारशक्तीवर पडतो. परिणामी रुग्ण बरा झाल्यानंतरही त्याला कमजोरी जाणवते. अशा वेळी रुग्णाला इतर आजारांचा धोका संभावतो. ते टाळण्यासाठी त्याचे योग्य निदान होणे आवश्यक आहे. यासाठी रुग्णाचे एचआरसीटी स्कॅन करणे आवश्यक ठरते. कोरोनाच्या या परिस्थितीमध्ये बहुतांशी लोक एचआरसीटी स्कॅन काढत आहेत. मात्र डॉक्टरांच्या सल्ल्यानेच ते काढले पाहिजेत. एचआरसीटी स्कॅन मुळे रुग्णाच्या संसर्गाचे प्रमाण लक्षात येते. एचआरसीटी स्कॅन केल्यास त्याला होउ शकणारा संभाव्य धोका लक्षात येतो व तसे उपचार करता येतात. अंगावर आजार काढणे किंवा कोरोनामधून बरे झाल्याचे समजून स्वतच औषध बंद करणे, ही धोकादायक बाब आहे. कोणत्याही रुग्णाने स्वत:च्या मनाने औषधे बंद करू नये. बरे झाल्यानंतर सकस आहार, हलका व्यायाम सुरू ठेवावा, असा सल्ला तहसीलदार कानडजे यांनी दिला आहे.तसेच तालुक्यात म्युकर माइकोसिस या बुरशीजन्य आजाराचा एक रुग्ण आढळून आला असल्याने नागरिकांनी अफवांना बळी न पडता म्युकर माइकोसिस हा आजार संसर्गजन्य नसल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.संभाव्य कोरोनाच्या तिसऱ्या लाटेच्या दृष्टीने प्रशासन सतर्क झाले असुन नागरिकांनी लहान मुलांची विशेष काळजी घ्यावी व कोरोना आजाराची लक्षणे असलेल्या सर्वांनी चाचणी करून घ्यावीत असे आवाहन तहसीलदार डॉ रवींद्र कानडजे यांनी दैनिक देशोन्नतीच्या माध्यमातून तालुका वासीयांना केले आहे.