
प्रतिनिधी:सुमित शर्मा,नाशिक
नाशिक मध्ये आम आदमी पार्टीचे राज्य प्रवक्ते आणि Operation Hospital या अभियानाचे समन्वयक श्री जितेंद्र भावे यांच्या नेतृत्वात कोरोना महामारीच्या काळात नाशिक मध्ये सामान्य रुग्णाचे करोडो रुपये वाचले आहेत. हॉस्पिटलकडून वाढीव शुल्क आकारून होणारी लूट, औषध विक्रीचा काळाबाजार, वैद्यकीय तपासण्यांचे अव्वाच्या सव्वा दर आणि Blood Bank कडून Plasma साठी होणारी पिळवणूक असे अनेक विषय घेत जितेंद्र भावे यांनी पुराव्यासकट काळा कारभार जनतेसमोर उघड केला आहे.
काल नाशिक मधील नामांकित Wockhardt हॉस्पिटल मध्ये एका गरीब कुटुंबातील तरुणांसाठी जितेंद्र भावे यांना अर्धनग्न होऊन आंदोलन करावे लागले. त्यानंतरच मुजोर Wockhardt हॉस्पिटल प्रशासनाने Deposit परत केले. इतकी भयानक परिस्थिती या महाराष्ट्रात आहे. यानंतर पोलीस प्रशासनाने “चोर सोडून संन्याशाला फाशी” या न्यायाने वागत सामान्य माणसाचा आवाज जितेंद्र भावे यांनाच बेकायदेशीररित्या अटक केली. अर्थात जनक्षोभ उसळलेला पाहून पोलिसांना अखेर नाईलाजाने जितेंद्र भावे यांची सुटका करणे भाग पडलेच. परंतु जितेंद्र भावे यांच्याशी वर्तन करताना पोलिसांनी जणू काही एखाद्या सराईत गुंडासारखे त्यांना वागविले याचा आम आदमी पार्टी तीव्र निषेध करत आहे. ऑपरेशन हॉस्पिटलच्या मागे आम आदमी पक्ष बुलंदपणे उभा राहिलेला आहे आणि येथून पुढे ही उभा राहणार आहे.
महाराष्ट्र सरकार सार्वजनिक आरोग्याला प्राथमिकता देत नाही. दिल्लीतील केजरीवाल सरकार आरोग्यावर बजेटच्या १३% रक्कम खर्च करते तर महाराष्ट्र सरकार अवघे ३% रक्कम खर्च करते. राज्याच्या आरोग्य विभागात 17000 तर वैद्यकीय शिक्षण विभागात 11000 पदे रिक्त आहेत. मेडिकल कॉलेज सम्राट सत्तेत बसले आहेत. त्याच्यामुळे इथले सरकारी दवाखाने नेहमी अशक्त राहिलेले आहेत आणि याचा फायदा घेऊन मोठी कॉर्पोरेट हॉस्पिटले सर्वसामान्य रुग्णांची लुबाडणूक करत आहेत. मढयाच्या टाळूवरील लोणी खाणाऱ्या आरोग्याच्या बाजारीकरणाला वेळीच चाप घालण्याची गरज आहे. कोविडच्या या संकट काळामध्ये राज्य सरकारने सामान्य जनतेच्या बाजूने उभे राहावे आणि दोषी कॉर्पोरेट रुग्णालयांवर कारवाई करावी अशी मागणी आम आदमी पक्षाचे राज्य सचिव धनंजय शिंदे यांनी केली आहे.
कालच्या घडामोडीबद्दल आज आम आदमी पार्टीच्या वतीने खालील प्रमुख मागण्या करण्यात येत आहेत –
१. Wockhardt हॉस्पिटल ने तात्काळ पीडित रुग्ण आणि कुटुंबीयाना जो मानसिक आणि आर्थिक त्रास झाला आहे याचा दंड म्हणून नुकसान भरपाई द्यावी.
२. Wockhardt हॉस्पिटल ने राज्य शासनाचा स्पष्ट निर्देश असताना सुद्धा कोणत्या कायद्याअंतर्गत Covid रुग्णाकडून Deposit घेतले. या संदर्भात शासन आणि प्रशासन यांनी काय कारवाई हॉस्पिटल वर केली. आम्ही हॉस्पिटलची मान्यता तात्काळ रद्द करण्याची मागणी करत आहोत.
३. कोरोना महामारी सुरु झाल्यापासून आजपर्यंत महाराष्ट्रातील सर्व खासगी हॉस्पिटलचे Audit महाराष्ट्र शासनाने करावे आणि रुग्णांचे लुटलेले पैसे व्याज आणि दंडासकट परत करावेत.
आगामी काळात आम आदमी पार्टी महाराष्ट्रात अतिशय तीव्र स्वरूपाचे आंदोलन करून रुग्णहक्क सुरक्षित रहावेत तसेच आरोग्य क्षेत्रातील बाजारीकरणची किड नष्ट व्हावी यासाठी अधिक ताकदीने काम करेल… जेणेकरून प्रामाणिक सेवा देणाऱ्या अनेक डॉक्टर्स आणि आरोग्य कर्मचारी यांना चांगले काम करता येईल आणि सामान्य जनतेला सुद्धा दिलासा मिळेल.
