वरिष्ठ अधिवक्ता मारहाण प्रकरणी ठाणेदारावर निलंबनाच्या कारवाईची मागणी

सहसंपादक:प्रशांत बदकी


महाराष्ट्र नवनिर्माण जनहित कक्ष व विधी विभागाचे मुख्यमंत्र्यांना निवेदन
वाशिम – मालेगाव येथील वरिष्ठ अधिवक्ता सुदर्शन गायकवाड हे आपल्या पत्नीला वाहनाव्दारे दवाखान्यात घेवून जात असतांना २२ मे रोजी ठाणेदार आधारसिंह सोनुने व सहकारी पोलीसांनी अडवून विनाकारण मारहाण केली. या घटनेचा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या जनहित कक्ष व विधी विभागाच्या वतीने तीव्र निषेध व्यक्त करण्यात आला. या प्रकरणी जिल्हा पोलीस अधिक्षक व ठाणेदार सोनुने यांच्यावर सात दिवसाच्या आत निलंबनाची कारवाई करण्यासह सदर प्रकरणाची तक्रार नोंदवून घटनेचा तपास सीबीआयमार्फत करण्याची मागणीही करण्यात आली आहे. तसेच कारवाई न झाल्यास राज्यात तीव्र आंदोलन करण्यात येईल असा इशारा देण्यात आला. मनसे विधी विभागाचे राज्य उपाध्यक्ष अ‍ॅड. पंकज फेदरे व जिल्हाध्यक्ष अ‍ॅड. नामदेवराव जुमडे यांच्या नेतृत्वात २६ मे रोजी जिल्हाधिकारी मार्फत मुख्यमंत्री, गृहमंत्री तसेच पालकमंत्र्यांना निवेदन पाठविण्यात आले.
निवेदन देतांना मनसेचे जिल्हा अध्यक्ष मनिष डांगे , जनहित कक्ष व विधी विभागाचे प्रदेश अध्यक्ष अ‍ॅड. किशोर शिंदे, उपाध्यक्ष अ‍ॅड. पंकज फेदरे, विधी विभाग जिल्हा अध्यक्ष अ‍ॅड.नामदेवराव जुमडे, जनहित कक्ष व विधी विभागाचे अ‍ॅड. परमेश्वर शेळके, उपाध्यक्ष अ‍ॅड. संतोष इंगळे, अ‍ॅड. आशीष गहुले, अ‍ॅड. मनोज बोडखे, जिल्हा सचिव अ‍ॅड. मनोज राठोड, जेष्ठ विधिज्ञ अ‍ॅड. जगताप, अ‍ॅड. अनंतराव वाघ, अ‍ॅड. ज्ञानेश्वर कह्राळे, अ‍ॅड. विनोद सानप, अ‍ॅड. महिंद्रा भालेकर, अ‍ॅड. विष्णु गवळी, अ‍ॅड. भुषण साठे आदी उपस्थित होते.
निवेदनात नमूद आहे की, मालेगाव येथील अधिवक्ता सुदर्शन गायकवाड हे २२ मे रोजी सांयकाळी घरी जात असतांना त्यांनी पोलिस अधिक्षक यांच्या वाहनाला ओव्हरटेक केले, त्यानंतर मालेगाव पोलिस स्टेशनचे ठाणेदार आधारसिंह सोनोने व त्यांचे इतर सहकारी पोलिस अधिक्षक वाशिम यांच्या सांगण्यावरू त्यांचे घरी गेले. त्यांच्याशी अश्लिल भाषेत शिवीगाळ करून त्यांना मारहाण करण्यास सुरुवात केली. त्यांचे पत्नी व मुलगा हे उपस्थित पोलिस कर्मचारी व ठाणेदार यांना समजाविण्यासाठी आले असता, त्यांना सुध्दा संबंधीत पोलिस कर्मचार्‍यांनी काठीने मारहाण केली व अधिवक्ता सुदर्शन गायकवाड, त्यांचा मुलगा आदित्य गायकवाड यांना पोलिस स्टेशन मालेगाव येथे नेण्यात आले. पोलिस स्टेशनला गेल्यानंतर अधिवक्ता गायकवाड यांना व त्यांच्या परिवारातील इतर सदस्यांना अमानुषपणे केलेल्या मारहाणीबाबत रितसर तक्रार संबंधीत ठाणेदार यांच्याकडे दिली. अधिवक्ता गायकवाड यांनी संबंधीत ठाणेदाराकडे घडलेल्या अमानुष मारहाणीबाबतचे लेखी तक्रार संबंधी ठाणेदार साहेबांनी कोणत्याही प्रकारची कार्यवाही न करता त्या पालिकडे जाऊन सदर लेखी तक्रार बेकायदेशिरपणे फाडून टाकली. घटनेनंतर अंदाजे ७ तासाने अ‍ॅड.सुदर्शन गायकवाड व त्यांच्या मुलाविरुध्द भा.दं.वी. चे कलम ३५३, ३३२ व ३४ अंतर्गत खोटा गुन्हा दाखल करून त्यांना बेकायदेशिर अटक केली. पोलिस अधिकारी यांचा अहंकार दुखावल्या गेल्यामुळे वरील घटना घडली आहे. वकील हे ऑफीसर ऑफ द कोर्ट असतात यांची साधी जाणीव न ठेवता अधिवक्ता गायकवाड व त्यांचे कुटूंबातील सदस्यांना अमानुषपणे मारहाण केलेली आहे व त्यांच्या विरुध्द खोटे गुन्हे दाखल केले आहे व त्यांची लेखी तक्रार फाडून टाकली. जिल्हा विधीज्ञ संघ वाशिम, मंगरुळपीर विधीज्ञ संघ,मालेगाव विधीज्ञ संघ, रिसोड विधीज्ञ संघ, दिग्रस विधीज्ञ संघ, अकोला विधीज्ञ संघ, मुर्तीजापूर विधीज्ञ संघ व महाराष्ट्रातील बर्‍याचशा विधीज्ञ संघांनी तातडीची सभा घेवून व त्या संबंधीचा लेखी ठराव, पारीत करून वरील नमुद घटनेचा कडक निषेध केला आहे. या घटनेबाबत महाराष्ट्रातील संपूर्ण वकील वर्गामध्ये असंतोषाचे व असुरक्षीततेचे वातावरण निर्माण झाले आहे. महाराष्ट्रातील अनेक विधीज्ञ बार असोसिएशनने सदरहु वरील नमुद अमानवीय व अमानुष घटनेसंबंधी निषेध व्यक्त करून त्या अनुषंगाने सदर घटनेमध्ये गुंतलेल्या संबंधीत पोलिस कर्मचारी व अधिकारी यांच्याविरुध्द त्यांनी कायद्याच्या चौकटीच्या बाहेर जाऊन बेकायदेशिर केलेल्या कृत्याबदल कारवाई करण्याबाबतचे ठराव पारीत करून तात्काळ व कडक कार्यवाहीसाठी व दोषीच्या निलंबनासाठी शासनाकडे पाठविले आहे.
तरी या प्रकरणातील दोषी मालेगाव पोलिस स्टेशनचे ठाणेदार व जिल्हा पोलिस अधिक्षक यांचे तात्काळ ७ दिवसाचे आत निलंबन करण्यात यावे. सदर प्रकरणाची चौकशी होवून सिबीआयमार्फत करण्यात यावे व त्यांचा रिपोर्ट तात्काळ नोंदवून घेण्यात यावा. सदर रिपोर्टची सुध्दा कार्यवाही वरिष्ठ अधिकारी यांच्या मार्फत करण्यात यावी. असे न झाल्यास मनसे विधी विभाग यांच्या वतीने महाराष्ट्रभर कठोरआंदोलन करण्यात येईल, असा इशारा निवेदनाव्दारे देण्यात आला.