शाळा व शिक्षक न पाहताच पहिलीतील मुले गेली दुसरीत


राळेगाव तालुका प्रतिनिधी:-रामभाऊ भोयर (9529256225)


इयत्ता पहिलीच्या वर्गात पडलेले पाऊल म्हणजे शालेय जीवनाची सुरुवात होय याच वर्गात बोबड्या बोलात बाराखडी आणि सवंगड्यांसोबत बालगीतांचा सूर आवळला जातो आणि सरत्या शैक्षणिक वर्षात कोरोनाने शाळेत प्रवेशीत झालेल्या पहिली च्या चिमुरड्या साठी शाळेची घंटा वाजली नाही त्यामुळे पहिल्या वर्गात दाखल झालेले विद्यार्थी शाळा अन शिक्षक न पाहताच गेली दुसऱ्या वर्गात.
मागीलवर्षी पासून कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे प्राथमिक शाळा बंदच राहिल्या जे शिक्षण द्यायचे होते ते ऑनलाईन पद्धतीने देण्यात आले शासनाने इयत्ता पहिली ते आठवी पर्यंत सर्वच मुलांना पास केले इयत्ता पहिलीच्या वर्गात प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांना शाळा पाहायला मिळाली ना शिक्षक पाहायला मिळाले. शाळा व शिक्षकांचे तोंडही न पाहणारे विद्यार्थी दुसरीत गेले अशा स्थितीमुळे शिक्षणाच्या भविष्याविषयी प्रश्न निर्माण झाला आहे.
कोरोनाचा प्रादुर्भाव वाढल्याने गेल्या मार्च महिन्यापासून लॉकडाऊन लागले कोरोना चा संसर्ग दिवसेंदिवस वाढतच गेला परिणामी शाळा महाविद्यालय बंद ठेवण्याचे आदेश शासनाच्यावतीने देण्यात आले मध्यंतरीच्या काळात काही दिवस कोरोनाची स्थिती सुधारल्याने इयत्ता दहावी व बारावीच्या तासिका कोरोनाचे नियम पाळून सुरू ठेवण्यात आल्या कालांतराने इयत्ता आठवी नववी इयत्ता पाचवी पर्यंतच्या वर्गांना परवानगी देण्यात आली मात्र वर्षभरात इयत्ता पहिली ते चौथी चे वर्ग सुरू झाले नाही या सर्व विद्यार्थ्यांना ऑनलाइन पद्धतीने शिक्षण देण्याचे आदेश शासनाच्या वतीने देण्यात आले. ग्रामीण भागातील बऱ्याच कुटुंबातील पालकांना आजही स्मार्टफोन कसा हाताळला जातो याचे ज्ञान नाही आणि सर्व शिक्षण तर ऑनलाईन झाले आहे त्यामुळे मागीलवर्षी प्रत्यक्षात शाळेतील संवगडयासोबत अध्ययन करण्याची संधी गमवावी लागली आहे. यावर्षी सुद्धा कोरोनाची तिसरी लाट येण्याची शक्यता असल्याने सध्या शासन २८ जून पासून शाळा ऑनलाईन सुरू होणार असल्याने यावर्षी तरी शाळेत जाण्याची संधी मिळेल की नाही असे विद्यार्थ्यांना वाटू लागले आहे.