एमपीएससीचा बळी स्वप्नील लोणकरच्या कुटुंबाच्या कायमस्वरुपी पुनर्वसनाची मागणी


वाशिम – एमपीएससी स्पर्धा परिक्षा उत्तीर्ण झाल्यानंतरही नोकरी मिळत नसल्याने निराश होवून आत्महत्येसारखे टोकाचे पाऊल उचलणार्‍या स्वप्नील लोणकर यांच्या कुटुंबाला भरीव अर्थसहाय्य देवून कुटुंबातील एका सदस्याला शासकीय नोकरी देण्याची मागणी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने करण्यात आली आहे. या आत्महत्या प्रकरणी पक्षाच्या वतीने शासनाचा निषेध नोंदविण्यात आला असून मनसेचे प्रभारी जिल्हाध्यक्ष मनिष डांगे यांच्या नेतृत्वात ५ जुलै रोजी जिल्हाधिकारी यांच्यामार्फत मुख्यमंत्र्यांना निवेदन पाठविण्यात आले.
निवेदनात नमूद आहे की, राज्यातील स्वप्नील लोणकर नावाचा युवक एमपीएससी परिक्षा उर्त्तण झाल्यानंतर नोकरीच्या आदेशाचे प्रतिक्षेत असतांना मानसिकदृष्ट्या अतिविचलीत होवून आर्थिक कर्जाचे ओझे असहनिय झाल्याने मृत्युला कवटाळुन आपला जिव गमावला आहे. सदर घटनेमुळे शासनाचा नाकर्तेपणा उघडकीस आला असून या आत्मत्या प्रकरणाचा पक्षच्या वतीने आम्ही जाहीर निषेध करीत आहोत. शासनाने एमपीएसपी स्पर्धा परिक्षेचा बळी ठरलेल्या स्वप्नील लोणकर यांच्या कुटुंबाच्या आजन्म उदरनिर्वाहाची व निवार्‍याची व्यवस्था सन्मानाने करुन द्यावी. तसेच लोणकर यांच्या कुटुंबाला भरीव अर्थसहाय्य देवून कुटुंबातील एका सदस्याला शासकीय नोकरीत सामावून घ्यावे. यासोबतच स्वप्नील लोणकर सारखी अवस्था इतर मुलांची होवू नये याकरीता प्रतिक्षेत असलेल्या उमेदवारांना रिक्त जागेवरे नियुक्ती द्यावी जेणेकरुन इतर युवक मानसिकदृष्ट्या विचलीत होवून आत्महत्या करणार नाहीत, असेही शेवटी निवेदनात नमूद केले आहे. निवेदन देतांना महाराष्ट्र सैनिक मोहन कोल्हे, श्री देशमुख, सुहास जाधव, प्रतिक कांबळे, विनोद सावके, वेदांत ढवळे आदी उपस्थित होते.