पाणी प्रश्नासाठी मनसे चे घागर आंदोलन , मालेगाव नगर पंचायत ला घागर भेट देऊन बेताली कारभाराचा निषेध

  • Post author:
  • Post category:इतर


वाशिम – मालेगाव शहरातील नागरीकांना नियमित व शुध्द पाण्याचा पुरवठा व्हावा यासाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने गेल्या सहा महिन्यापासून तीव्र आंदोलनाचा पवित्रा घेतला आहे. याअंतर्गत ११ जानेवारी रोजी जिल्हाध्यक्ष मनिष डांगे यांच्या मार्गदर्शनात व महिला सेनेच्या सदस्या सौ. संगीता चव्हाण, सिता धंदरे, सौ. बेबी धुळधुळे, बेबी कोरडे, सौ. वंदना अक्कर, श्रीमती वनिता पांडे, सौ. अर्चना इंगळे, प्रमिला थोरात, क्षमाबाई यांच्या नेतृत्वात घागर आंदोलन राबविण्यात आले. यावेळी नगर पंचायतच्या अधिकार्‍यांना घागर भेट देवून अभिनव पध्दतीने निषेध व्यक्त करण्यात आला. यावेळी लुकमान शाहा, विक्की वर्मा, गोविंद अहिर, महेश पांडे, प्रतिक कांबळे आदी उपस्थित होते.
यासंदर्भात दिलेल्या निवेदनात नमूद आहे की, गेल्या दोन ते अडीच वर्षाचे कालावधीपासून महिन्यातून दोन ते तीन वेळा एका खेपेला दोन तास म्हणजेच संपूर्ण महिन्यामध्ये केवळ सहा तास व पाईपलाईन मधील शिल्लक पुरवठा एका खेपेला साधारण अर्धा तास एकूण दीडतास म्हणजेच महिन्यातून सात ते आठ तास पाणीपुरवठा करण्यात येतो. यामधुन आम जनतेची तहान भागत नाही. या तुटपुंज्या पुरवठ्यामुळे नागरकांना भटकंती करावी लागते. तसेच संपुर्ण वर्षामध्ये होणार्‍या ८० ते १०० तास पाणी पुरवठ्याकरीता संपूर्ण पाणीकर म्हणजेच वर्षाला रुपये १२०० भरावा लागतो. पुरवठा व वसुली याबाबत हा झिजीया कर कमी करण्यात यावा व नागरीकांना पिण्याचे पाण्याचा पुरेसा पुरवठा नियमितपणे करण्यात यावा यासाठी मनसेच्या वतीने वेळोवेळी तीव्र आंदोलने राबविण्यात आले. व निवेदनासह साडीचोळीचा आहेरही ददेण्यात आला होता. मात्र न.प. अधिकार्‍यांना जाग आली नाही. त्यामुळे नियोजित घागर मोर्चाला पोलीसांनी परवानगी नाकारल्यामुळे अभिनव पध्दतीने घागर आंदोलन राबवून अधिकार्‍यांना घागर भेट देण्यात आली. नागरीकांना नियमित व शुध्द पिण्याच्या पाण्याचा पुरवठा न झाल्यास मनसेच्या वतीने तीव्र आंदोलन उभारण्यात येईल असा इशारा दिलेल्या निवेदनाव्दारे देण्यत आला आहे.