तांदूळ तस्करीचे धागेदोरे नागपूर-भंडारा पर्यंत ,मोठे मासे गुंतले असण्याची शक्यता

  • Post author:
  • Post category:इतर

राळेगाव तालुका प्रतिनिधी:-रामभाऊ भोयर (9529256225)

केळापूर तालुक्यातून जाणाऱ्या रेशनच्या तांदळाचे धागेदोरे पांढरकवडा ते बोरीमार्गे नागपूर भंडारापर्यंत असून याची सखोल चौकशी केल्यास या तस्करीतील मोठ-मोठे मासे महसूल व पोलिस प्रशासनाच्या हाती लागू शकतात. यासाठी फक्त दोन्ही विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी याची सखोल चौकशी करण्याकरिता आपली इच्छाशक्ती दाखविण्याची आवश्यकता आहे.

 

तालुक्यात तेलंगणातील रेशनचा तांदूळ जास्त प्रमाणात येत असला तरी तालुका जिल्ह्यातील रेशनचा तांदूळसुद्धा येथील तांदूळ तस्कर जमा करून त्याची विल्हेवाट लावत आहेत. दिवसेंदिवस अनेक नवनवीन तांदूळ तस्कर यामध्ये उतरत असून काही राजकीय पक्षांच्या पांढरपेशा पदाधिकाऱ्यांनीसुद्धा या तांदूळ तस्करीत उडी घेतल्याची चर्चा चौकाचौकात रंगत आहे. रेशनच्या तांदूळ तस्करीचे कनेक्शन बोरी ते पांढरकवडा आणि नागपूर व भंडारापर्यंत असल्याची चर्चा आहे. रेशनच्या तांदळावर थातुरमातुर प्रक्रिया करून तोच तांदूळ किराणा दुकानातून ब्रँडेड कंपनीच्या नावावर ४० ते ५० रुपये किलोने ग्राहकांच्या माथी मारण्यात येत आहे. तालुक्यातील रेशनच्या तांदूळ तस्करीला महसूल व पोलिस विभागातील काही लालची अधिकाऱ्यांचे पाठबळ लाभत असल्याची चर्चा व आरोप सर्वसामान्य नागरिकांतूनही होत आहे.

एवढ्या मोठ्या प्रमाणात रेशनच्या तांदळाचा काळाबाजार सुरू असताना त्यावर कारवाई नाममात्र दिसून येत आहे. याकडे जिल्हा पुरवठा अधिकारी सुद्धा हेतुपुरस्सर दुर्लक्ष करीत असल्याचे दिसून येत आहे. २४ नोव्हेंबर रोजी करंजी रोड पोलिसांनी ट्रक क्रमांक एमएच ४० वाय ९७६३ मधून ४ लाख १९ हजार २५० रुपये किमतीचा २१५ क्विंटल पकडला होता. तांदूळ

तांदूळ त्या खरेदीबाबत व्यापाराने पावत्या दाखविल्या. परंतु केळापूर तालुक्यासह संपूर्ण यवतमाळ जिल्ह्यात कुठेही भातशेती करण्यात येत नाही. ज्या परिसरात भातशेतीच नाही तर त्या व्यापाऱ्याने एवढा मोठा तांदूळ कोणत्या शेतकऱ्याकडून खरेदी केला हे एक न सुटणारे कोडेच आहे. त्या व्यापाऱ्याने खरेदी केलेल्या तांदळाची पांढरकवडा कृषी उत्पन्न बाजार समिती मध्ये नोंद आहे का, त्याने दाखवलेल्या तांदूळ खरेदीच्या पावत्या बनावट होत्या की खऱ्या हे कोणत्या आधारावर निश्चित करण्यात आले. या सर्वांचा जाब आता तांदूळ रेशनचा नसल्याचे आढळून येत ना असल्याचा अहवाल देणाऱ्या निरीक्षण अधिकाऱ्यास वरिष्ठांनी विचारण्याची आवश्यकता आहे. ट्रक पकडल्यानंतर त्या तांदळाबाबत प्रयोगशाळेच्या अहवालाची प्रतीक्षा न करताच काही तासातच निरीक्षकांनी आपला अहवाल दिल्याने यात पाणी कुठेतरी नक्कीच मुरत असावे असा संशय आहे. आता तर प्रयोगशाळेत पाठवण्यात आलेले ते तथाकथित नमुने त्या ट्रकमधल्या तांदळाचे पाठवले की दुसरे कोणते पाठवले यावरही नागरिक शंकाकुशंका व्यक्त करीत आहेत.

1