
(प्रतिनिधी) शेख रमजान
पावसाळा तोंडावर आला असतानाही उमरखेड शहर आणि तालुक्यातील रस्त्यांची कामे अर्धवट स्थितीत असल्याने नागरिकांना मोठ्या त्रासाला सामोरे जावे लागत आहे. या पार्श्वभूमीवर, शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) गटाचे जिल्हा समन्वयक संजय बाबूलाल पलये (पळसकर) यांनी जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देऊन ही कामे तत्काळ पूर्ण करण्याची मागणी केली आहे.
दिलेल्या निवेदनानुसार, उमरखेड शहर आणि तालुक्यातील अनेक ठिकाणी रस्ते खोदून ठेवल्यामुळे वाहतुकीला अडथळा निर्माण होत आहे. तसेच, काही नवीन सिमेंट रस्त्यांच्या बाजूला मातीचे मुरूम टाकण्याचे काम सध्या सुरू आहे. यामुळे ये-जा करणाऱ्या नागरिकांना, विशेषतः विद्यार्थ्यांना अपघाताचा धोका निर्माण झाला आहे.
पावसाळा सुरू होण्यापूर्वी ही सर्व कामे युद्धपातळीवर पूर्ण करावीत, अशी विनंती पळसकर यांनी केली आहे. जर वेळेत कामे पूर्ण झाली नाहीत आणि नागरिकांना काही इजा किंवा अपघात झाला, तर त्याला संबंधित अधिकारी सर्वस्वी जबाबदार राहतील, असेही पत्रात नमूद करण्यात आले आहे.प्रशासनाने या विषयावर तातडीने बैठक घेऊन मार्ग काढावा, अन्यथा शिवसेना (उबाठा) उमरखेडच्या वतीने रस्ता रोको आणि तीव्र आंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा या निवेदनाद्वारे देण्यात आला आहे. या निवेदनाच्या प्रती उपविभागीय अधिकारी कार्यालय, उमरखेड यांनाही सादर करण्यात आल्या आहेत.
