
(प्रतिनिधी) शेख रमजान
उमरखेड तालुक्यातील बिटरगाव बु. येथे यात्रा पाहण्यासाठी गेलेल्या एका १६ वर्षीय मुलाचा विहिरीत पडून मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. विहीर जमिनीच्या लेव्हलला असल्याने रात्रीच्या अंधारात अंदाज न आल्याने हा अपघात घडल्याचे प्राथमिक वृत्त आहे.
आनंदा अशोक वड्डेलू (वय १६ वर्षे, रा. बेलगाव मंडळ कबीर) असे मृत मुलाचे नाव आहे. आनंदा हा आपल्या आजोबांकडे बिटरगाव येथे राहून शिक्षण घेत होता. सध्या गावात यात्रा सुरू असल्याने तो बुधवार रात्री १० ते ११ च्या सुमारास यात्रा पाहण्यासाठी घराबाहेर पडला होता. दरम्यान, विहिरीचा अंदाज न आल्याने तो त्यात कोसळला.
घटनेची माहिती मिळताच त्याला तातडीने उपचारासाठी ढाणकी येथील ग्रामीण रुग्णालयात हलवण्यात आले, मात्र डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले.शवविच्छेदन करून मुर्तदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला. या घटनेमुळे बेलगाव आणि बिटरगाव परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.
या प्रकरणाचा तपास बिटरगाव पोलीस स्टेशन ठाणेदार पांडुरंग शिंदे यांच्या मार्गदर्शनात बिटरगाव पोलीस जमादार संतोष चव्हाण आणि पो अमलदार दत्ता कवडेकर यांनी केला.
