शेतमजूर ते टोकियो ऑलिम्पिक पर्यंत चा प्रवीण चा प्रवास,वाचा सविस्तर

सातारा जिल्ह्यातील फलटण तालुक्यातील सरडे गावातील एका मजूर आईवडिलांच्या पोटी जन्मलेल्या प्रवीण जाधव याची ऑलिम्पिकसाठी निवड होते आणि बघता बघता आपल्या अतुलनीय कामगिरीच्या व कष्टाच्या जोरावर जगातील उत्कृष्ट अंतिम सोळा खेळाडूंमध्ये प्रवेश करून क्रमांक एक वर असलेल्या खेळाडूला टक्कर देतो पण काही कारणास्तव पराभूत झालेल्या प्रवीण चे कौतुक करावे तेवढे कमीच.

खूप अभिमान वाटतो त्या आई वडिलांचा ज्यांनी शेतमजुरी करून आपल्या मुलाला शिकवले व नंतर खेळासाठी प्रोत्साहित केले.
प्रवीणचा धनुर्विद्या खेळातील प्रवास अतिशय खडतर असा आहे. परंतु त्याची जिद्द आणि चिकाटीच्या जोरावर सातारा जिल्ह्याचा व सरडे गावचा डंका आज सातासमुद्रापार ऑलिम्पिकमध्ये वाजवला यात तीळमात्र शंका नाही.

सुरुवातीला प्रविणने बांबुपासून तयार केलेल्या धनुष्य-बाणाने सराव करण्यास सुरुवात केली. कालांतराने प्रविणने या खेळात गती पकडत सर्व प्रतिस्पर्ध्यांना मागे टाकण्यास सुरुवात केली. वर्षभरापूर्वी प्रविण हा स्पोर्ट्स कोट्याअंतर्गत भारतीय लष्करात दाखल झाला. नोकरी लागल्यानंतरही आपला फॉर्म कायम राखला तर आगामी टोकियो ऑलिम्पिकमध्ये त्याला नक्की संधी मिळेल असा विश्वास प्रविणच्या प्रशिक्षकांनी दोन वर्षांपूर्वीच व्यक्त केलेला. जो आज प्रविणने खरा केला.

प्रवीणचा लहान गावातून सुरू झालेला हा अविश्वसनिय, आदर्शवत प्रवास संपूर्ण देशातल्या गावाकडील व खेड्यांतील होतकरू व जिद्दी खेळाडूंच्या प्रेरणेचा अविभाज्य भाग असेल. घरची परिस्थिती अतिशय बिकट असताना त्याने हे यश मिळवले आहे.

प्रवीणने आतापर्यंत दहा वेळा भारतीय संघाचे प्रतिनिधित्व केलेले आहे. बऱ्याच आंतरराष्ट्रीय स्पर्धांमध्ये पदक देखील प्राप्त केलेली आहेत.
सातारा जिल्ह्यातील अजून खेळाडू ऑलिम्पिक स्पर्धेपर्यंत पोहोचावेत. मी ऑलिम्पिकपर्यंतचा प्रवास यशस्वीपणे करु शकलो, तसेच अजून खेळाडू देखील तयार व्हावेत ही त्याची तळमळ अतिशय स्तुत्य आहे.