
बाह्यप्रेरणेपेक्षा आंतरिक प्रेरणा प्रबळ करा – उपविभागीय अधिकारी श्रीकांत उंबरकर
अनुभवाची शिदोरी आयुष्यात उपयोगी पडेलच – उंबरकर
ग्रेट भेट – जि.प.स्पर्धा परीक्षा केंद्राचा उपक्रम
तालुका प्रतिनिधी/३०ऑक्टोबर
काटोल – जीवनात व स्पर्धा परीक्षेत यशस्वी व्हायचे असेल तर सकारात्मक दृष्टीकोन बागळा. ध्येयापर्यत पोहोचण्याच्या सर्व मार्गाची चाचपणी करा.बाह्यप्रेरणेपेक्षा आंतरिक प्रेरणा प्रबळ करा.निसर्गतः सर्वांची बुद्धिमत्ता समान असली तरी प्रयत्नाने बुद्धिमत्ता कमविता येते.आयुष्यात चांगले पेराल तर चांगलेच उगवेल.म्हणून व्यक्तिमत्त्व विकासाकरिता प्रयत्न करा तुम्ही जीवनात नक्कीच यशस्वी होणारच असे प्रेरणादायी विचार उपविभागीय अधिकारी श्रीकांत उंबरकर यांनी ग्रेट भेट उपक्रमांतर्गत जि.प.स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन व अभ्यास केंद्र, काटोल येथे विद्यार्थ्यांशी संवाद साधतांना प्रकट केले.
कार्यक्रमाचे मार्गदर्शक म्हणून उपविभागीय अधिकारी श्रीकांत उंबरकर, तर प्रमुख अतिथी म्हणून गटशिक्षणाधिकारी संतोष सोनटक्के, शिक्षण विस्तार अधिकारी नरेश भोयर, केंद्रसमन्वयक एकनाथ खजुरीया, केंद्रप्रमुख योगेश चरडे,उपक्रम संयोजक राजेंद्र टेकाडे प्रामुख्याने उपस्थित होते.
विद्यार्थ्यांच्या शारीरिक व मानसिक आरोग्य सुदृढ राखण्यासाठी योग, प्राणायाम, ध्यान महत्त्वाचे आहे.अभ्यासकेंद्रात योगावर्ग घेणाऱ्या योगप्रशिक्षक आरती कावडकर यांचा सन्मानचिन्ह व प्रमाणपत्र व पुष्पगुच्छ देऊन गौरव करण्यात आला.
पुढे श्रीकांत उंबरकर म्हणाले, स्पर्धा परीक्षेची तयारी करणारे सर्वच यशस्वी होत नाही.मात्र केलेला अभ्यास कधीच वाया जात नाही.अनुभवाची शिदोरी आयुष्यात कामी पडतच असते. प्रामाणिक सचोटीतूनच यशाला गवसणी घालता येते.
सकारात्मक लोकांना जवळ करा व नकारात्मक लोकांना दूर करा.स्व आत्मपरीक्षण करून आपली कमतरता जाणून त्यावर तोडगा काढा.अभ्यास किती केला याला महत्व नसून कसा याला महत्त्व आहे.म्हणून विचारांचे व अभ्यासाचे सूक्ष्म नियोजन करा.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक नरेश भोयर , संचालन अरुणा नेहारे तर आभार प्रदर्शन तनुश्री गजभिये यांनी केले.कार्यक्रमाच्या यशस्वीसाठी सतिश बागडे, अनुसया रेवतकर, समिक्षा किटूकले, बबिता नासरे, अंजली पवार, सृष्टी डांगोरे, प्रणय महाजन, प्रितम नाईक,आदित्य बाभूळकर, विशाल शिवणकर, धनंजय ढगे, उद्देश ढगे, युगान थोटे आदींनी सहकार्य केले.
बॉक्स
अपघाताने स्पर्धा परीक्षा क्षेत्राकडे वळलो.
मी मध्यमवर्गीय कुटूंबातील शिक्षकाचा मुलगा आहे.सर्वसामान्य बुद्धिमत्तेचा विद्यार्थी म्हणून वर्गात गणला जात होतो.बारावीत द्वितीय श्रेणीत उत्तीर्ण झालो होतो.बी.एस्सी झाल्यावर स्पर्धा परीक्षेची माहिती मिळाली.पदवी नंतर नेटवर्किंग काम केले, काही काळ फटाके विकले मात्र धंदाच बुडाला.जिद्दीने अभ्यास केला.प्रथम पीएसआय नंतर असिस्टंट कमांडर पोस्ट मिळाली.एमपीएससी च्या परीक्षेत पास होऊन तहसीलदार झालो व आज आपल्यासमोर उपविभागीय अधिकारी म्हणून उभा आहे.
स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करतांना अमरावती येथे एमपीएससीचे क्लास घेतले.आज अभिमान वाटतो की, माझ्या क्लासचे सर्वच विद्यार्थी प्रशासकीय सेवेत आहे, अशी माहिती उंबरकर यांनी दिली.
