
राजुरा: तालुक्यातील जगतगुरु तुकोबाराय सार्वजनिक वाचनालय वरूर रोड येथे महान स्वतंत्रता सेनानी क्रांतीसुर्य बिरसा मुंडा यांची १४६ वी जयंती साजरी करण्यात आली. सर्वप्रथम बीरसा मुंडा यांच्या प्रतिमेचे पूजन करून त्यांच्या पावन स्मृतीस विद्यार्थ्यांनी पुष्पहार अर्पण करून जयंती साजरी केली. गेल्या तीन,चार वर्षापासून वरूर रोड येथील वाचनालयात महापुरुषांची जयंती, पुण्यतिथी साजरी केली जाते. महामानवाचा विसर होऊ नये म्हणून विद्यार्थ्यासाठी उपक्रम,विविध स्पर्धेचे आयोजन नेहमी विशाल शेंडे हा युवक करत असतो. विद्यार्थ्याना बोलता यावं त्यांना त्यांच्या हक्काचं व्यासपीठ उपलब्ध व्हाव,त्यांच्या कौशल्याचा विकास व्हावा यासाठी गावातील वाचनालयात नेहमी कार्यक्रमाचे आयोजन केले जाते. महानायक बिरसा मुंडा यांच्या जीवनावर श्रुती बोरकर, समीक्षा मोडक, व मेघा करमनकर या युवतीने वाचनायलात उपस्थित विद्यार्थ्याना मोलाचे मार्गदर्शन केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मेघा करमनकर हिने केले तर आभार समीक्षा जीवतोडे या विद्यार्थ्यांनीने मानले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी प्रवीण चौधरी, मयूर जानवे, आशिष नगराळे या विद्यार्थ्याचे सहकार्य लाभले.
