
नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज देशवासियांना संबोधित करत मोठी घोषणा केली आहे. मोदींनी तीन कृषी कायदे मागे घेत असल्याचे सांगितले आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे. तसंच, गेल्या दीड वर्षांपासून सुरू असलेल्या शेतकऱ्यांच्या आंदोलनाचा मोठा विजय झाला आहे. ‘मी देशवासियांची क्षमा मागतो. आमच्या तपस्येतच काही कमी राहिली असेल. काही शेतकऱ्यांना आम्ही या गोष्टी समजावू शकलो नाही. आम्ही या कायद्यांचं महत्व सांगण्याचा पूर्ण प्रयत्न केला. आज गुरु नानकजींचे प्रकाश पर्व आहे त्यानिमित्ताने आज आम्ही संपूर्ण देशाला सांगण्यासाठी पुढे आलो आहोत की आम्ही तिन्ही कृषी कायदे मागे घेत आहोत, असं पंतप्रधान नरेंद्र मोदींनी सांगितले.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सांगितले की, ‘शेतकऱ्यांच्या समस्या मला माहीत आहेत. त्या मी जवळून पाहिल्या आहेत. 100 पैकी 80 छोटे शेतकरी आहेत. त्यांच्याकडे दोन हेक्टरपेक्षा कमी जमीन आहे. त्यांच्या संपूर्ण आयुष्याचा आधार हा जमिनीचा तुकडा आहे. या तुटपुंज्या जमिनीच्या साहाय्याने तो आपला आणि आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करतो. पिढ्यानपिढ्या होणारी कौटुंबिक विभागणी ती लहान करत आहे. आम्ही शेतकऱ्यांच्या हितासाठी खूप काम केले आहे. शेतकऱ्यांच्या हितालाच आम्ही प्राधान्य दिलं. पीक विमा योजना प्रभावी करण्यात आली आहे. 22 कोटी मृदा आरोग्य पत्रिका देण्यात आल्या आहेत. शेतकऱ्यांच्या खात्यात एक लाख 62 हजार कोटी रुपये जमा करण्यात आले. अल्पभूधारक शेतकऱ्यांना सरकारकडून मदत देखील केली जात आहे.’
‘शेतकऱ्यांच्या हितासाठी तीन कृषी कायदे आणले. वर्षानुवर्षे ही मागणी देशातील शेतकरी, कृषी तज्ज्ञ, शेतकरी संघटनांकडून होत होती. यापूर्वीच्या सरकारांनीही यावर विचारमंथन केले होते. लहान शेतकऱ्यांच्या हितासाठी आम्ही हा कायदा आणला. अनेक शेतकरी संघटनांनी याचे स्वागत केले. परंतु या कायद्यांचे शेतकरी हिताचे फायदे काही शेतकऱ्यांना आम्ही समजावून सांगू शकलो नाही. या शेतकऱ्यांची समजूत काढण्याचा प्रयत्न सर्वत्र करण्यात आला. सरकारने चांगल्या हेतूने कायदा आणला होता. आम्ही नम्रपणे शेतकऱ्यांना समजावण्याचा प्रयत्न केला. आज गुरु नानकजींचे प्रकाश पर्व आहे. त्यानिमित्ताने आज आम्ही संपूर्ण देशाला कळवायला पुढे आलो आहोत की आम्ही हे तीनही कृषी कायदे मागे घेण्याचा निर्णय घेतला आहे.’, असे मोदींनी सांगितले. त्याचसोबत, ‘सरकारने शेतकऱ्यांकडून विक्रमी खरेदी केली आहे. आज केंद्राचे कृषी बजेट पूर्वीच्या तुलनेत पाच पटीने वाढले आहे. कृषी बाजारांच्या नूतनीकरणावर बरेच काम झाले आहे. छोट्या शेतकऱ्यांची शक्ती वाढवण्यासाठी 10 हजार शेतकरी उत्पादक संघटना स्थापन करण्यात येत आहेत.’, असे देखील ते म्हणाले.
