
राळेगाव तालुका प्रतिनिधी:-रामभाऊ भोयर (9529256225)
त्रिपुरा मध्ये घडलेल्या कथित घटनेच्या पार्श्वभूमीवर समाजकंटकांकडून महाराष्ट्रात (अमरावती, नांदेड, मालेगाव) दंगलीचा प्रकार घडविण्यात आला. या दंगलीमध्ये निष्पाप व्यापाऱ्यांचे अतोनात नुकसान झाले.
कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे आधीच सर्व व्यापारी चिंताग्रस्त होते. नुकतेच व्यापाऱ्यांनी आप आपले दुकाने पूर्ववत सुरु केली होती. आणि त्यामध्ये या समाजकंटकांनी विनाकारण दंगल घडवून व्यापाऱ्यांच्या दुकानावर दगडफेक करून त्यांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान केले.
राज्यात कायदा व सुव्यवस्था अबाधित ठेवण्याची जबाबदारी सरकारची आहे. कोणत्याही कारणास्तव दंगल घडली कि त्याचे लक्ष फक्त निष्पाप व्यापाऱ्यालाच केले जाते.
आत्ता घडलेल्या दंगलीमध्ये ज्या व्यापाऱ्यांचे नुकसान झाले त्याचा पंचनामा करून त्वरित त्या व्यापाऱ्यांना नुकसान भरपाई द्यावी. तसेच भविष्यात अश्या प्रकारच्या दंगलीमध्ये व्यापाऱ्यांचे जे काही नुकसान होत असेल त्याची संपूर्ण जबाबदारी सरकारने घ्यावी. अश्या प्रकारचे निवेदन भाजपा व्यापारी आघाडीचे प्रदेश कार्यकारिणी सदस्य तथा पश्चिम विदर्भ प्रमुख विवेक बनगिनवार यांनी दिग्रस पोलीस स्टेशन चे ठाणेदार सोनाजी आम्ले यांच्या मार्फत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना दिले.
