
राळेगाव तालुका प्रतिनिधी:-रामभाऊ भोयर(9529256225)
राळेगाव बाजार समितीमार्फत सोयाबीन तारण योजना तालुक्यात राबविण्यात आली. त्याचा लाभ शेतकऱ्यांनी घेऊन शेतकऱ्यांना तारणापोटी ४७ लाख रुपयांची मदत झाली. आता सोयाबीनच्या दरात वाढ झाल्याने शेतकऱ्यांना तारण योजनेचा मोठा लाभ झाला आहे.बाजार समितीमार्फत दरवर्षी सोयाबीन तारण योजना राबविली जाते. ती योजना यावर्षीही राबविण्यात आली. यावर्षी या योजनेचा लाभ तालुक्यातील ६७ शेतकऱ्यांनी घेतला. त्यांना बाजार समितीकडून सोयाबीन तारणापोटी ४७ लाख रुपयांचे कर्ज मिळाले. बाजार समिती हे कर्ज सहा टक्के वार्षिक दराने देते. शिवाय हमीभावाच्या ७५ टक्के कर्ज बाजार समिती देते. सोयाबीनचा हमीभाव ३,९५० रुपये आहे. एकरी सहा क्विंटल इतकाच माल तारण ठेवला जातो.
इतर कुठलाही चार्ज बाजार समितीकडून घेतला जात नाही. शिवाय त्यासाठी शेतकऱ्यांचे आधार कार्ड, सातबारा, एवढेच कागदपत्रे लागतात. याशिवाय इतर कुठलेही कागदपत्रे लागत नाहीत. शिवाय कागदपत्रांची पूर्तता केल्यावर तत्काळ माल तारण ठेवला जातो. याला कोणाच्या शिफारशीची गरज नाही. ही योजना गेल्या १६ ऑक्टोबरपासून सुरू करण्यात आली असून, ती अजूनही सुरूच आहे. सोयाबीनचा माल निघाला तेव्हा चार हजार रुपये भाव होता. आज आठ हजार रुपये आहे, ज्या शेतकऱ्यांना तेव्हा पैशांची गरज होती व त्यासाठी कमी किमतीत सोयाबीन विकावे लागणार होते. अशा शेतकऱ्यांना बाजार समिती तारण योजनेचा मोठा लाभ झाला. तारण योजनेमुळे शेतकऱ्यांची आर्थिक गरजही भागली व आता सोयाबीनला भाव असल्याने शेतकऱ्यांच्या सोयाबीनला भावही मिळणार आहे. सचिव सुजितभाऊ चल्लावार, निरीक्षक विनोदभाऊ झामरे यांच्या देखरेखीखाली ही योजना राबविली जाते.
सरकारने सोयाबीन पेंड आयात केले. त्यामुळे सोयाबीनचे भाव पडले. अशा वेळेस आम्ही ही योजना राबविली. याचा चांगला लाभ शेतकऱ्यांना झाला आता, सोयाबीनचे भाव वाढत आहे. भविष्यातही वाढणार आहे. महत्त्वाचे म्हणजे पणन महासंघाने निधी न देता बाजार समितीने स्वतः जवळील निधीतून ही योजना राबविली. शेतकऱ्यांच्या सहकार्यामुळेच ही योजना राबविता आली. याप्रमाणेच तूर पिकाचीही तारण योजना आम्ही राबविणार आहोत.
–अॅड. प्रफुल्लभाऊ मानकर, सभापती, बाजार समिती, राळेगाव.
