पूजा कावळे हत्याकांडातील आरोपींना14 दिवसांची न्यायालयीन कोठडी

राळेगाव तालुका प्रतिनिधी:-रामभाऊ भोयर (9529256225)

दिग्रस पोलिस ठाण्यांतर्गत सावंगा (बु) ते चिरकुटा मार्गावर चव्हाण यांच्या शेतात 16 नोव्हेंबरला सकाळी पूजा कावळे (रा. शेलोडी, ता. दारव्हा) हिचा मृतदेह कुजलेल्या अवस्थेत आढळल्याने तिचे भाऊ भोजराज पंजाब वानखडे यांनी पोलिसात तक्रार दाखल केली. त्यावरून पोलिसांनी अज्ञात आरोपीवर खुनाचा गुन्हा दाखल करून तपास कार्य सुरू केले.

उपविभागीय पोलिस अधीक्षक आदित्य मिरखेलकर यांच्या नेतृत्वात ठाणेदार सोनाजी आम्ले व सहाय्यक निरीक्षक विजय रत्नपारखी यांनी तपासाची दिशा घेत मोबाईल कॉल डिटेल्सवरून 4 आरोपींना वेगवेगळ्या ठिकाणाहून एकाच वेळी ताब्यात घेतले. पोलिसांनी कसून चौकशी केली असता हा खून पूजाचा पती अनिल रमेश कावळे यानेच कट रचून केला असून या खुनाचा मास्टर माइंड तोच असल्याचे निष्पन्न झाले.यातील आरोपी उज्ज्वल नगराळे, गौरव राऊत, अभिषेक म्हात्रे यांनी पूजा कावळे हिचा ओढणीने गळा आवळून खून केला. त्यांच्यासह मुख्य सूत्रधार पती अनिल कावळे याला पोलिसांनी अटक केली. या हत्याकांडात वापरण्यात आलेले चारचाकी इंडिगो वाहन क‘. एमएच12 एसक्यू2177 अचलपूर पोलिसांकडून जप्त करण्यात आले असून या वाहनाचा चालक फरार असल्याचे पोलिस सूत्रांनी सांगितले.पूजा कावळे हत्याकांडातील या आरोपींना दिग‘स न्यायालयाने 25 नोव्हेंबरपर्यंत पोलिस कोठडी सुनावली होती. या कालावधीत त्यांनी गुन्ह्याची कबुली दिली. आरोपी गौरव पूजाच्या पतीचा नातेवाईक असून तो उज्ज्वल याचा मित्र आहे. उज्ज्वलने पूजासोबत दोन महिन्यात मोबाईलवरून जवळीक निर्माण केली. पूजाला पुणे घेऊन जाण्यासाठी त्याने दिग‘स येथे वाहन आणले.

दिग‘स शिवाजी चौक येथून वाहनात पूजाला सावंगा ते चिरकुटा मार्गावरील चव्हाण यांच्या शेतात नेऊन तिचा ओढणीने गळा आवळून हत्या केली. पुरावा नष्ट करण्याच्या उद्देशाने दिग‘स आर्णी मार्गावरील तुपटाकळी जवळील नागोबा मंदिराजवळ तिची पर्स व मोबाईल फेकून दिला. तसेच हे हत्याकांड घडविण्यासाठी 3 लाखांची सुपारी पूजाच्या पतीने दिली असल्याची कबुली दिली. पोलिस कोठडीचा कालावधी संपल्याने पोलिसांनी या चार आरोपींना दारव्हा न्यायालयात हजर केले. न्यायालयाने त्यांना 8 डिसेंबरपर्यंत, म्हणजे 14 दिवस न्यायालयीन कोठडीत रवाना केले.