मातीचा ढिगारा न दिसल्याने कारचा अपघात

तालुका प्रतिनिधी:-रामभाऊ भोयर (9529256225)

वाहतूक वळविण्यासाठी रस्त्यावर तात्पुरत्या स्वरूपाचा तयार करण्यात आलेला मातीचा ढिगारा कार चालकाला न दिसल्याने एका कारला अपघात घडला. हि घटना शुक्रवारी सकाळी ६ वाजता दरम्यान घडली असून या अपघातात सुदैवाने कुठलीही जिवीत हानी झाली नसली तरी महामार्ग कंत्राटदारांच्या चुकीमुळेच हा अपघात घडला असल्याचे दिसून येत आहे. हैद्राबाद येथून दोन इसम महामार्ग क्रमांक ४४ ने टि.एस.१५ ई. एक्स. १९७६ या टाटा कंपनीच्या कारने वर्धा येथील उत्तम गालवा या कंपनीत कामानिमित्त जात होते. दरम्यान वडकी पोलिस ठाण्याच्या हद्दीतील कारेगांव फाट्याजवळ वाहतूक वळविण्यासाठी तयार करण्यात आलेल्या माती व डांबराचा ढिगारा चालकाला न दिसल्याने कार थेट त्या ढिगाऱ्यावर चढली व डिव्हायडरला धडक देऊन कार पलटी झाली. या अपघातात अत्याधुनिक एअर बॅग उघडल्याने कार मधील दोन्ही इसमांना कुठलीही दुखापत झाली नाही. या ठिकाणी दैनंदिन अपघात घडत असतांना मात्र संबंधितांकडून कुठल्याही उपाय योजना केल्या जात नाहीत. गेल्या पंधरा दिवसांपासून यवतमाळ व वर्धा जिल्ह्याला जोडणाऱ्या कारेगांव नजिकच्या वर्धा नदीच्या पुलाच्या डागडुजीचे काम अतिशय कासव गतीने सुरू असुन या मार्गाने एकेरी वाहतूक सुरू आहे. वाहतुक वळविण्यासाठी तयार करण्यात आलेला मातीचा ढिगारा अनेकांचा काळ ठरत आहेत.