
राळेगाव तालुका प्रतिनिधी:-रामभाऊ भोयर (9529256225)
सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार स्थानिक स्वराज्य संस्थाच्या स्थगित नागरिकांचा मागासवर्ग प्रवर्गाच्या निवडणुकांच्या जागा आता अनारक्षित करून त्या सर्वसाधारण प्रवर्गातून भरण्यात येणार आहे. त्यानुसार जिल्ह्यातील नगरपंचायतीच्या स्थगित केलेल्या १८ जागा आणि ग्रामपंचायतच्या १७ जागांवर सर्वसाधारण प्रवर्गातून १८ जानेवारी रोजी मतदान होणार आहे. या बरोबरच या जागांसह २१ डिसेंबर रोजी होणाऱ्या निवडणुकांचा निकालही सर्व ठिकाणी एकाच दिवशी १९ जानेवारीला जाहीर करण्यात येणार आहे.
राज्य निवडणूक आयोगाने शुक्रवारी याबाबतचे आदेश जारी केले. यवतमाळ जिल्ह्यात सध्या सहा नगरपंचायतीमध्ये निवडणूक होत आहे तर १२५ ग्रामपंचायतीमध्ये २०० सदस्यांसाठी पोटनिवडणुकीची प्रक्रिया सुरू आहे. दरम्यान, सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या यापूर्वीच्या निकालानुसार जिल्ह्यातील नगरपंचायतीच्या ओबीसी प्रवर्गातील १८ सदस्य निवडीला आणि १७ ग्रामपंचायत सदस्यांच्या निवडीला स्थगिती देण्यात आली होती. सर्वोच्च न्यायालयाच्या या निर्णयामुळे या जागांचे काय होणार याची चर्चाही राजकीय वर्तुळात रंगली असतानाच शुक्रवारी राज्य निवडणूक आयुक्तांनी नव्याने आदेश जारी केला.
या आदेशानुसार, नगरपंचायतीच्या स्थगित झालेल्या ओबीसींच्या १८ जागा आता सर्वसाधारण प्रवर्गातून भरण्यात येतील, यासाठी १८ जानेवारी रोजी मतदान होईल. तर सध्या सुरू असलेली नगरपंचायतीची निवडणूक नियोजित कार्यक्रमानुसार पार पाडली जाणार असून त्यांचे मतदान पूर्वनियोजनाप्रमाणे २१ डिसेंबर रोजी होणार आहे. परंतु आता निवडणूक आयोगाच्या आदेशानुसार मतमोजणी मात्र सर्व ठिकाणी एकाच दिवशी म्हणजे १९ जानेवारी रोजी होणार आहे. पूर्वी मतमोजणी २२ डिसेंबर रोजी नियोजित होती.
महिलांसाठी आरक्षण
सहा नगरपंचायतीतील ओबीसी प्रवर्गाच्या १८ जागा आता सर्वसाधारण प्रवर्गातून भरण्यात येणार आहे. त्यामुळे या जागांपैकी सर्वसा धारण महिलांकरिता आरक्षित •ठेवावयाच्या जागांसाठी संबंधित ठिकाणी सोडत काढण्यात येणार आहे.
