शिक्षकांच्या प्रलंबित मागण्या/समस्येसाठी विमाशिसंघाचे २७ डिसेंबरला आंदोलन

विमाशिसंघाचे विदर्भस्तरीय धरणे

राळेगाव तालुका प्रतिनिधी:-रामभाऊ भोयर (9529256225)

                  

खाजगी व स्थानिक स्वराज्य संस्था अंतर्गत प्राथमिक, माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळा तसेच खाजगी आश्रम शाळेतील शिक्षक – शिक्षकेतर कर्मचारी यांच्या प्रलंबित मागण्या व समस्या सोडविण्यासाठी विदर्भ माध्यमिक शिक्षक संघातर्फे सोमवार दि. २७ डिसेंबर २०२१ ला विदर्भातील सर्व माध्यमिक शिक्षणाधिकारी कार्यालयासमोर धरणे / निदर्शने आंदोलन आयोजित केले आहे. यवतमाळ येथील आंदोलन प्रांतीय अध्यक्ष एस.जी. बरडे यांचे नेत्रुत्वाखाली होणार आहे.
यासंदर्भात विदर्भ माध्यमिक शिक्षक संघाचे प्रांतीय अध्यक्ष श्रावण बरडे व सरकार्यवाह सुधाकर अडबाले यांनी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार, शालेय शिक्षणमंत्री वर्षाताई गायकवाड व इतर मागास बहुजन कल्याण विभागाचे मंत्री विजय वडेट्टीवार यांना नुकतीच लेखी नोटीस पाठविली आहे.
१ नोव्हेंबर २००५ पूर्वी नियुक्त विनाअनुदानित / अंशतः अनुदानित शाळा / तुकडीवर नियुक्त शिक्षक – शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना १९८२ ची कुटुंब निव्रुत्ती वेतन योजना लागू करुन त्यांचे प्रलंबित ६ व्या वेतन आयोगाचा तिसरा, चौथा, पाचवा हप्ता तात्काळ अदा करणे, १ नोव्हेंबर २००५ नंतर नियुक्त शिक्षक – शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना लागू असलेली अंशदायी निव्रुत्ती वेतन योजना / राष्ट्रीय निव्रुत्ती वेतन योजना रद्द करुन १९८२ ची कुटुंब निव्रुत्ती वेतन योजना लागू करणे, दि. १२/१५ फेब्रुवारी २०१५ शासन निर्णयान्वये अनुदानास अपात्र ठरलेल्या शाळा / तुकड्यांना तात्काळ त्रुटींची पूर्तता करुन अनुदानास पात्र घोषित करणे व निधीची तरतुद करणे, भविष्य निर्वाह निधी परतावा / नापरतावा, वैद्यकीय देयके, अर्जित रजा रोखीकरण व इतर देयके मंजुरात करण्यासंदर्भाने शालार्थ प्रणालीमध्ये बंद करण्यात आलेली टॅब (बिडीएस) तात्काळ सुरु करणे, १०, २०, ३० वर्षाची आश्वासित प्रगती योजना सर्व शिक्षक – शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना लागू करणे या व इतर अनेक प्रलंबित मागण्या व समस्याकरिता हे विदर्भस्तरीय धरणे / निदर्शने आंदोलन विदर्भ माध्यमिक शिक्षक संघाने आयोजित केले आहे.
विमाशिसंघाने सोमवार दि. २७ डिसेंबरला आयोजित केलेले हे आंदोलन दुपारी ३ ते ५ या कालावधीत होणार असून आंदोलन यशस्वी होण्याकरिता यवतमाळ जिल्ह्यातील शिक्षक – शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी अमरावती शिक्षणाधिकारी (माध्य) यांचे कार्यालयासमोर बहुसंख्येने उपस्थित राहून आंदोलन यशस्वी करावे असे आवाहन महाराष्ट्र राज्य माध्यमिक शिक्षक महामंडळाचे अध्यक्ष माजी आमदार व्ही.यू. डायगव्हाणे, विमाशिसंघाचे प्रांतीय अध्यक्ष श्रावण बरडे व सरकार्यवाह सुधाकर अडबाले, प्रांतीय उपाध्यक्ष अरविंद देशमुख, विभागीय कार्यवाह एम.डी. धनरे, जिल्हाध्यक्ष अशफाक खान, जिल्हा कार्यवाह रामकृष्ण जिवतोडे, उपाध्यक्ष श्रावणसिंग वडते, साहेबराव धात्रक, पवन बन, आनंद मेश्राम, संतोष हेडावू, अरुण गारघाटे आदि पदाधिकाऱ्यांनी केले आहे.