
तालुका प्रतिनिधी:-रामभाऊ भोयर (9529256225)
दिग्रस – हिंदुस्थानचे अखंड दैवत आणि आदर्श राजा म्हणून जगात ओळख असणाऱ्या छत्रपती शिवाजी महाराज यांच्या बंगळूरू (कर्नाटक) येथील सदाशिव पेठेतील अश्वारूढ पुतळ्याची शाई फेकून विटंबना करण्यात आली.या घटनेचा तीव्र निषेध करीत दिग्रस येथील अखिल भारतीय मराठा महासंघ व शिवप्रेमींनी नायब तहसीलदार वसंत राठोड यांच्या मार्फत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना दि.२० डिसेंबर रोजी निवेदन सादर केले आहे.
छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याची विटंबना करणाऱ्या आरोपींवर कारवाई करण्याऐवजी कर्नाटकमधील सरकार व स्थानिक पोलिस शिवप्रेमींना, मराठी भाषिकांना आणि महाराष्ट्र एकीकरण समितीच्या कार्यकर्त्यांना अटक करीत आहेत. केंद्र व कर्नाटक सरकारने या बाबीची गांभीर्याने दखल घेऊन दोषींवर तातडीने कारवाई करण्याबाबत ठोस पावले उचलावे.अखिल भारतीय मराठा महासंघ व शिवप्रेमी या घटनेचा तीव्र निषेध करीत असून विटंबना करणाऱ्या आरोपींना तात्काळ अटक करून त्यांच्यावर कडक कारवाई करावी,अशी मागणी निवेदनातून करण्यात आली आहे.
निवेदनावर दिलीप महिपाल,सुरेश झोळ, सुरेंद्र इंगळे, प्रवीण मालाधरे,शुभम कुलटे, प्रज्योत अरगडे, कृष्णा वाळसकट,प्रदीप झोडगे, कपिल इंगळे,अमोल कुलटे, युवराज जाधव,मनीष सावंत,दत्ता सावंत,राजू कोळसे, संजय हुरडे यांच्यासह अ.भा.मराठा महासंघ व अन्य शिवप्रेमींच्या स्वाक्षऱ्या आहेत.
