
तालुका प्रतिनिधी:-रामभाऊ भोयर (9529256225)
मारेगाव तालुक्यासह वरोरा , उमरी येथून मोठ्या प्रमाणात गोवंश व मांसाची विक्री करण्यासाठी परराज्यात जात असून त्याचे मुख्य केंद्र रोहपट बनत असल्याची धक्कादायक माहिती समोर येत आहे.हा व्यवसाय सुलभ करण्यासाठी एका पोलीस चालकाने कंबर कसून आपले इप्सित साध्य करण्याचा आटापिटा सुरू केला आहे.त्यामुळे राजरोसपणे सुरू असलेला गोवंश तस्करीचा गोरखधंदा जोमात सुरू आहे.
महाराष्ट्र सरकारने सन २०१६ मध्ये राज्यात गोवंश तस्करी व कत्तली करण्यावर बंदी घातली आहे.मात्र मारेगाव तालुक्यात हा व्यवसाय फोफावत खुद्द पोलीस प्रशासनाच्या एका वरिष्ठ चालकाच्या आशीर्वादाने तालुक्यातील चौफेर भागात गोवंश तस्करीने डोके वर काढले आहे. तालुक्यातील कुंभा , बोटोणी , मार्डी , वनोजादेवी , आकापूर , वेगाव , परिसासह चंद्रपूर जिल्ह्यातील वरोरा व केळापुर तालुक्यातील उमरी येथून मोठ्या प्रमाणात गोवंश तस्करी केल्या जात आहे.एक पोलीस चालक हे गोवंश सावकाश जाण्यासाठी नेहमीच प्रयत्नशील असल्याचे बोलले जात आहे.हे गोवंश मारेगाव मार्गे ‘रोहपट’ येथे गोळा होत तेलंगणा , आंध्रप्रदेश राज्यात रवाना होत आहे.त्यामुळे रोहपट हे तस्करीचे हब असल्याची माहिती समोर येत आहे.
या तस्करीसाठी कधी टेम्पो तर कधी पायदळ असा प्रकार चालत असून थेट तस्करी सोबत गोवंश विक्री करणाऱ्या व कत्तलखाने चालविणाऱ्या सोबतच स्थानिक पोलीस चालकाचे संगनमत असल्याने हा व्यवसाय चांगलाच फावत आहे.दरम्यान संगनमत असल्यानेच अपेक्षेप्रमाणे कारवाई होतांना दिसत नाही.या गोरखधंद्याने सर्वत्र संतापाची लाट उसळत असतांना वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी हा विषय गांभीर्याने घेऊन मारेगाव तालुक्यातील गोवंश तस्करीवर अंकुश लावावा अशी मागणी परिसरातील लोकांनी केलेली आहे.
