नाते आपुलकीचे संस्थेतर्फे 3 गरजूंना मदतिचा हात,पुन्हा जपलं माणुसकीचं नातं!


चंद्रपूर : चंद्रपूर आणि परिसरातील अत्यंत गरजू लोकांना नाते आपुलकीची संस्था ही देवदूतासारखे काम करीत असून,अत्यावश्यक वेळी गरजूंना आर्थिक मदत होत असल्याने संस्थेचे कार्य डोळ्यात भरण्यासारखे झाले आहे.संस्थेने यापूर्वीही समाजातील गरजूंना केवळ दोन वर्षात वेळोवेळी चार लाखाच्या वर आर्थिक सहाय्य केले आहे.
यावेळी मारडा गावातील रहिवासी असणारा युवक योगेश मुक्के, भद्रावती येथील गृहस्थ बंडू झिंगु पिंगे आणि वरोरा बोर्डा गावातील बारा वर्षीय आदित्य उमेश येटे यांना प्रत्येकी 10 हजार रुपयांची आर्थिक मदत करण्यात आली.
प्राप्त माहितीनुसार योगेश मुक्के हा युवक सरदार पटेल महाविद्यालयात एमए ला शिक्षण घेत असून त्याला कावीळ या आजाराने ग्रासले,त्याला वडील नाही,आई मोलमजुरी करते आणि आर्थिक परिस्थिती अत्यंत बिकट असल्याने त्याने संस्थेच्या एका सदस्यकरवी मदतीची मागणी केली,तसेच भद्रावती येथील बंडू पिंगे हे घरचे एकमेव कर्ते आहेत आणि मुलीच्या लग्नामुळे आणि बिमारीमुळे त्यांना स्वतःचे राहते घर सुद्धा विकावे लागले, त्यांच्या मेंदूला नियमित रक्तपुरवठा होत नसल्याने वारंवार चक्कर येणे अशा प्रकारचा आजार झालेला आहे,परिस्थिती अतिशय दयनीय आणि दुसरे कोणी मदत करणारे नसल्याने संस्थेकडे त्यांची मदतीची मागणी आली आणि तिसरी मागणी उमेश येटे बोर्डा येथील लहानग्या मुलासाठी आली जो की पतंग पकडण्याच्या नादात पूर्णपणे भाजल्या गेला,घरची परिस्थिती अत्यंत नाजूक आणि डॉक्टरांनी सांगितलेला 6 लाख रुपयांचा खर्च झेपण्यासारखा नव्हता,त्याच्या वडिलांनी संस्थेच्या एका सदस्यास मदत करण्यासंबंधी विनंती केली,या सर्वांना मदत करण्यासाठी संस्थेच्या मुख्य कार्यकारिणीत चर्चा झाली,प्रस्तुत गरजवंतांची चौकशी करून त्यांना प्रत्येकी 10 हजार रुपये असे तिघांना 30 हजार करावी असे ठरविण्यात आले आणि गरजुना तात्काळ मदत व्हावी म्हणून त्यांच्या खात्यांवर प्रस्तुत रक्कम वळती करण्यात आली.
नाते आपुलकीचे ही संस्था समाजातील गरजुना वेळोवेळी कामी पडत असून संस्थेचे 326 सदस्य आपल्या काटकसरीने काही रक्कम संस्थेत जमा करतात आणि ही रक्कम समाजातील एखाद्या गरजवंताला दिली जाते.मदतीबद्दल तिन्ही गरजवंतांनी संस्थेचे आभार मानले.