
वणी तालुक्यात वेकोलीच्या कोळसा खाणी व गिट्टी खदानी मोठ्या प्रमाणावर आहेत. या खाणी मुळे या परिसरातील नागरिकांना अनेक समस्यांना तोंड द्यावे लागत आहे. या नागरिकांच्या विविध समस्या पंतप्रधान जिल्हा खनिज विकास निधी उपलब्ध असतांना जिल्हा प्रशासन दुर्लक्ष करीत आहे. त्यामुळे जिल्हा प्रशासनाच्या विरोधात जिल्हा परिषद सदस्या तथा भाजपाच्या गटनेत्या मंगलाताई पावडे व इंदिरा सूत गिरणीचे संचालक दिनकर पावडे यांच्या नेतृत्वात नागरिकांनी धरणे आंदोलन केले. जिल्हा प्रशासनाने या खान बाधित क्षेत्राच्या समस्यांसाठी खनिज विकास निधी उपलब्ध करून न दिल्यास तीव्र आंदोलन करण्याचा इशारा देण्यात आला आहे.वणी तालुक्यातील घोन्सा, कुंभारखनी या कोळसा खदाणीतून अंदाजे एक कोटी टना पेक्षा अधिक कोळसा काढण्यात आला. घोन्सा- कायर जिल्हा परिषद क्षेत्रातील कुंड्रा, चिलई, हिवरधरा, अडेगाव, मोहदा या परिसरातुन मोठ्या प्रमाणावर गिट्टी काढण्यात येत आहे. या खदानीमुळे या परिसरात मोठ्या प्रमाणावर प्रदूषण निर्माण झाले आहे. त्या तुलनेत रायल्टीचा निधी या परिसरातील गावांना दिला गेला नाही. त्यामुळे पंतप्रधान खनिज विकास निधीतून रस्ते, आरोग्य, पाणी पुरवठा, शिक्षण व पर्यावरण या करिता निधी देण्यात यावा. शेतकऱ्यांना दिवसा विद्युत पुरवठा करण्यात यावा. सौर ऊर्जा प्रकल्प उभारण्याकरिता पशु संवर्धन विभागाला निधी उपलब्ध करून देण्यात यावा. बाधित भागात सिंचन वाढीकरिता विदर्भा व निर्गुडा नदीवर बंधारे बांधण्यात यावे. गाव तलाव खोलीकरण करण्यात यावे. शेतीला जोडधंदा म्हणून शेतकऱ्यांना दुधाळ जनावरे, कुक्कुट पालन, शेळी पालनासाठी निधी उपलब्ध करून देण्यात यावा. वेकोलीच्या घोन्सा खदाणीमुळे प्रदूषणात झालेली वाढ थांबविण्यात यावी. या व इतर मागण्या या धरणे आंदोलनाच्या माध्यमातून करण्यात आल्या आहेत.
