
राळेगाव तालुका प्रतिनिधी-रामभाऊ भोयर (9529256225)
पाळणा हा प्रत्येक बाळाला आवडतो. चिमुकले लेकरं पाळण्यात टाकताच झोपी जातात. मात्र हाच पाळणा दोन चिमुकल्यांच्या जीवावर उठला असून आज सहा महिन्यांचा तेजस व नऊ वर्षाची प्राची या जगाला अखेरचा निरोप देऊन काळाच्या पडद्याआड गेली आहे ते फक्त एक पाळण्या मुळेच. विजय घुक्से हे शेतकरी पुसद येथील महावीर नगर येथे राहतात. विजय यांना 4 अपत्य आहेत मात्र आज घुक्से परिवार शोकाकुल आहे ते एका पाळण्यामुळे. घुक्से यांचे लक्ष्मीनगर येथे शेत आहे याच शेतात प्राची चे वडील विजय घूक्से हे गांजर काढण्याचे काम करीत होते. तर आई सारिका ही सहा महिन्याच्या तेजस या बाळाला साडीने बांधलेल्या पाळण्याने झोका देत होती.
सकाळी 11 वाजता प्राची ही शाळा आटोपून शेतात आली. भूक लागल्याने आईला जेवण देण्याची विनंती केली. मात्र आईने तेजस ला झोका दे असे म्हणून आई ही पाणी आणण्यासाठी घरात गेली. तितक्यात सिमेंट ने निर्मित निकृष्ट दर्जाचा खांब अचानक तुटून प्राची च्या डोक्यावर आदळला त्यामुळे प्राची बेशुद्ध झाली. तर तेजस हा लहानगा जोरात बाजूला फेकल्या गेला. आई सारिका ही पाणी घेऊन बाहेर आल्यावर संपूर्ण प्रकार बघितला. आरडाओरड केली. वडील विजय यांनी दोन्ही चिमुकल्यांना तात्काळ खाजगी रुग्णालयात उपचारार्थ नेले मात्र डॉक्टरांनी प्राचीला मृत घोषित केले तर तेजसला नांदेड येथे रेफर करण्यात आले मात्र वाटेतच त्याचीही प्राणज्योत मालवली.आज हे दोघेही चिमुकले आपल्यात नाहीत मात्र या घटनेतून निकृष्ट दर्जाच्या सिमेंट खांबामुळे जीव सुद्धा जाऊ शकतो त्यामुळे अशा निकृष्ट खांबांचा वापर थांबविण्याची गरज आहे जेणे करून पुन्हा आपल्यातील प्राची व तेजस सारखे चिमुकले जीव गमवणार नाहीत.
