शहरात प्रभू श्रीराम जन्मोत्सव अतिशय उत्साहाच्या वातावरणात साजरा

शहरात प्रभू श्रीराम जन्मोत्सव अतिशय उत्साहाच्या वातावरणात साजरा करण्यात आला. प्रभू श्रीराम जन्मोत्सव समितीच्या वतीने श्रीराम जन्मोत्सवाची जय्यत तयारी करण्यात आली. संपूर्ण शहर तोरण पताकांनी सजविण्यात आले होते. श्रीराम नवमी निमित्त शहरवासियांमध्ये आज वेगळाच उत्साह पाहायला मिळाला. प्रत्येकच रामभक्त श्रीराम जन्मोत्सव साजरा करण्याच्या तयारीत लिन झाल्याचे पाहायला मिळाले. प्रभू श्रीरामाच्या जन्म घटकेच्या वेळेला श्रीराम मंदिरात ढोल ताशांचा गजर करण्यात आला. श्रीराम जन्मोत्सव समितीचे अध्यक्ष विजय चोरडिया यांच्या अध्यक्षतेखाली भव्य असा राम जन्मोत्सव सोहळा साजरा करण्यात आला. यावेळी तरुणांमध्येही श्रीराम जन्मोत्सव साजरा करण्याचा उत्साह पाहायला मिळाला. श्रीराम जन्मोत्सवात तरुणांचाही जल्लोष पाहायला मिळाला. श्रीरामाच्या जयघोषांनी अख्खे शहर दुमदुमले होते. श्रीराम नवमी निमित्त भव्य अशी आकर्षक व आदर्शवत शोभायात्रा काढण्यात आली. सायंकाळी वाजतगाजत निघालेल्या या शोभायात्रेत डोळ्याचे पारणे फेडणाऱ्या सजावटी करण्यात आल्या होत्या. सजलेल्या रथामध्ये प्रभू श्रीरामाची वेशभूषा साकारण्यात आली होती. रथातील श्रीरामाचे रूप धारण केलेली वेशभूषा सर्वांच्याच आकर्षणाचे केंद्र बनली होती. शहरातील प्रमुख मार्गाने मार्गक्रमण करित निघालेल्या या शोभायात्रेच्या स्वागताची टागोर चौक येथे श्रीराम जन्मोत्सव समितीच्या वतीने जय्यत तयारी करण्यात आली होती. फटाक्यांच्या आतिषबाजीने सारा आसमंत दणाणला होता. तरुणांच्या हातांमध्ये झळकणारे भगवे झेंडे शोभायात्रेची आणखीच शोभा वाढवत होते. श्रीरामांच्या गीतांवर तरुणाईची थिरकणारी पावले थकता थकत नव्हती. निर्बंधमुक्त जिवनाचा उत्साह सर्वांच्याच चेहऱ्यांवर ओसंडून वाहत होता. कोरोनामुळे दोन वर्ष सण उत्सव साजरे करता न आल्याने उत्साहावर विरजण आले होते. पण आज श्रीराम जन्मोत्सवात उत्साहाचा बांध फुटला होता. श्रीराम नवमी निमित्त संपूर्ण शहरात आनंदोत्सहाचे वातावरण पहायला मिळाले. शहरात ठिकठिकाणी श्रीराम जन्मोत्सवाच्या शुभेच्छांचे बॅनर व होल्डिंग्जने लावण्यात आले होते. राजकीय व सामाजिक पुढाऱ्यांसह प्रत्येकच क्षेत्रातील भक्तगण श्रीरामाच्या भक्तीत लिन झाल्याचे पाहायला मिळाले. समितीच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी एकाच रंगाचा पोशाख परिधान केला होता. भक्तगणही त्याच रंगाचा पोशाख परिधान करून शोभायात्रेत सहभागी झाल्याचे पाहायला मिळाले. श्रीराम मंदिर येथे शोभायात्रा पोहचल्यानंतर समितीचे अध्यक्ष विजय चोरडिया यांनी प्रभू श्रीरामाची आरती केल्यानंतर शोभायात्रेचे समापन झाले. श्रीराम जन्मोत्सवानिमित्त आयोजित सामाजिक, सांस्कृतिक अशा विविध कार्यक्रमांच्या यशस्वीतेकरिता व शोभायात्रेच्या नियोजनाकरिता श्रीराम जन्मोत्सव समितीचे अध्यक्ष विजय चोरडिया कार्यदक्ष अजीक्य शेंडे तथा समितीच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी विशेष सहकार्य केले. शोभायात्रेत सहभागी झालेल्या सर्वानीच उत्साहाबरोबरच सातत्य व शांतताही राखली.