मुलीच्या लग्नात कास्तकार विधवांना केले शिलाई मशीनचे वाटप !,भारतीय संविधान,पुस्तके , रोपटे देऊन पाहुण्यांचे स्वागत

राळेगाव तालुका प्रतिनिधी-रामभाऊ भोयर (9529256225)

      

दिग्रस येथील सामाजिक कार्यकर्ते व उपक्रमशील शिक्षक मजहर अहेमद खान रहेमान खान यांनी आज { ता १५ } आपल्या मुलीच्या लग्नात आत्महत्याग्रस्त कास्तकारांच्या विधवांना शिलाई मशीनचे वाटप करून समाजासमोर आदर्श प्रस्थापित केला आहे . एवढेच नव्हे तर त्यांनी येणाऱ्या पाहुण्यांचे भारतीय संविधानाच्या प्रती इतर पुस्तके व रोपटे देऊन स्वागत देखील केले .
दिग्रस शहरासह तालुक्यात सामाजिक , शैक्षणिक , सांस्कृतिक व जनहिताच्या कार्यासाठी परिचित असलेले अंजुमन उर्दू विद्यालयाचे सहायक शिक्षक मजहर अहेमद खान यांची कन्या मुनव्वर ताज हिचा विवाह आज सकाळी अकरा वाजता असेगांव जि. वाशीम येथील सरदार खान शाहनूर खान यांच्यासोबत पार पडला . लग्न मंडपात त्यांनी संगीता अशोक तुमाने , माला दिनेश राठोड , अंजुम परवीन शेख अय्युब , सुनीता प्रल्हाद मोहकर व संगीता अरुण लोखंडे या आत्महत्याग्रस्त कास्तकारांच्या विधवांना उदरनिर्वाहासाठी शिलाई मशीनचे वाटप करून प्रेरणा व आदर्शत्वाचा अभिनव पायंडा रचला . एवढेच नव्हे तर त्यांनी सर्व पाहुण्यांचे भारतीय संविधान , “शिवरायाचे निष्ठावंत मुस्लीम सैनिक” , स्त्रीभ्रूणहत्या आदी विषयावरील पुस्तके व रोपटे देऊन स्वागत केले .
मोठ्या मुलीच्या लग्नात देखील त्यांनी अपंगांना तीनचाकी साईकलींचे वाटप केले होते . त्यांचा मुलगा हस्सान अहेमद खान याने देखील महाराष्ट्र परीक्षा परिषद पुणेतर्फे घेण्यात आलेल्या पाचवी व आठवीची शिष्यवृत्ती आत्महत्याग्रस्त कास्तकांरांच्या पाल्यांच्या शिक्षणासाठी दान दिली , हे येथे उल्लेखनीय !
शिक्षक आमदार ऍड किरण सरनाईक , ज्येष्ठ काँग्रेस नेता व माजी मंत्री माणिकराव ठाकरे , माजी मंत्री संजय देशमुख , माजी आमदार ख्वाजा बेग , जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ दिलीप भुजबळ-पाटील, उपविभागीय पोलीस अधिकारी आदित्य मिरखेलकर , जिल्हा नियोजन समितीचे सदस्य सुधीर देशमुख, तहसीलदार सुधाकर राठोड , पोलीस निरीक्षक पांडुरंग फाडे, कबड्डीपटू प्यारेलाल पवार , प्रमोद बनगीनवार , तालुकाध्यक्ष रवींद्र अरगडे, मराठा सेवा संघाचे तालुकाध्यक्ष अशोक तायडे , माजी नगराध्यक्ष नूर मुहम्मद खान , शाम पाटील, भाईलाल गड्डा ,श्री घंटीबाबा संस्थानचे सचिव डॉ प्रदीप मेहता , श्री बालाजी बँकेचे उपाध्यक्ष यशवंत सुर्वे-पाटील , माजी उपनगराध्यक्ष जावेद पटेल , राष्ट्री, मेमन समाज संघटनेचे अध्यक्ष हाजी हारून इसानी , गफ्फार खानसह असंख्य प्राचार्य , प्राध्यापक , मुख्याध्यापक , शिक्षक , अजी-माजी नगरसेवक , सामाजिक कार्यकर्ते , विविध संघटनांचे पदाधिकारी वर-वधूकडील पाहुणे , पत्रकार व सर्वधर्मीय बांधव यावेळी उपस्थित होते . समाजशील व उपक्रमशील शिक्षक मजहर खान यांच्या दातृत्व व लग्नाला सामाजिक हिताची जोड दिल्याबद्दल त्यांचे सर्वत्र कौतुक व अभिनंदन होत आहे.