चार दशकांपासून वास्तव्यास असलेल्यांना रेल्वेने केले बेघर,रेल्वेच्या अतिक्रमण पथकाने पाडली तब्बल १७ घरे व दुकान

प्रतिनिधी – चैतन्य कोहळे

माजी जी.प.सदस्य प्रवीण सुर, राजेश रेवते,उल्हास रत्नपारखी याना पोलिसांनी केले नजरबंद

रेल्वे प्रशासनाने १७ नागरिकांना पुन्हा नोटीस बाजवून घरे रिकामी करण्याचे सूचना दिल्या होत्या. दरम्यान आरपीएफच्या जवानां कडून दररोज दवंडी देवून १३ मे पर्यंत घरे खाली करा, अन्यथा १४ मे पासून सदर घरे पाडणार असा अल्टीमेटम देण्यात आला होता. त्यानंतर रेल्वेच्या या कारवाईला येथील नागरिकांनी, संघर्ष समिती, व्यापारी संगटनांनी आंदोलन करून तीव्र विरोध केला. मात्र रेल्वे प्रशासन या तीव्र विरोधाला न जुमानता अतिक्रमण पथक,स्थानिक पोलिस प्रशासन व चारशेच्या संख्येत फौजफाट्यासह नियोजित रेल्वे साइडिंगच्या ठिकाणी येवून धडकले.या अतिक्रमण पथकाने साइडिंगकरिता अडथडा निर्माण करणाऱ्या १७ घराना व दुकानावर हटविण्याची धडक कारवाई करत सदर घरे व दुकान पाडण्यात आले. मंगळवारी सकाळी ६ वाजता अतिक्रमण कारवाईला सुरुवात करण्यात आली.सदर कारवाईसाठी २ जेसीबी मशीन लावण्यात आली.
हि कारवाई करण्यात आल्याने अनेक गोरगरीब कुटुंबे रस्त्यावर आली असून उन्हाळ्याच्या दिवसात तापमान ४७ डिग्री पर्यंत पोहोचला असून आता हे बेघर झालेल्या कुटुंबे जाणार कुठे असा प्रश्न निर्माण झाला आहे.रेल्वेच्या भखंडावर ४०-५० वर्षापासून नागरिक वास्तव्यास आहे. रेल्वेकडून घरे खाली करण्यासंदर्भात येथील रहिवाशांना नोटीस बजावण्यात आली होती. आज सकाळी रेल्वेने कारवाई केली.
अत्यंत गरीब परिस्थितीत जगण्यासाठी संघर्ष करणाऱ्या येथील नागरिकांत एकच खळबळ माजली. कारवाई करण्यापूर्वी आमची पर्यायी व्यवस्था करणे गरजेचे होते, असे येथील नागरिकांनी सांगितले. एवढेच नव्हे तर घरातील सामान खाली करण्याकरिता रेल्वे प्रशासनाला दोन दिवसांची मुदतही मागितली होती. मात्र रेल्वेने मुदत न देता थेट कारवाई केली. या कारवाईमुळे येथील गोरगरीब नागरिकांचे प्रचंड नुकसान झाले आहे. एकीकडे गरीबांना पंतप्रधान आवास योजनेंतर्गत घरे दिले जात आहे. दुसरीकडे गरिबांना बेघर केले जात असल्याचा संताप पीडित नागरिकांनी व्यक्त केला.शासनाने या गरीब नागरिकांना पंतप्रधान आवास योजनेचा लाभ मिळवून द्यावा, अशी मागणी त्यांनी केली.
दरम्यान रेल्वेच्या या जुल्मी कारवाईचा निषेध करण्याकरिता शेकडो पोलीस आणि आरपीएफ ला न घाबरता माजी जि.प.सदस्य प्रवीण सुर, राजेश रेवते, व्यापारी संगटनेचे अध्यक्ष उल्हास रत्नपारखी यांनी निषेध करून रेल्वे प्रशासन आणि वेकोली प्रशासच्या विरोधात नारेबाजी केली यावर स्थानिक माजरी पोलिसांनी त्यांना अटक करून कलम ६८ अंतर्गत नजरबंद केले. या दरम्यान लोकांचे जितासाठी संघर्ष करणारे त्यांच्या नेत्याला अटक केल्याने काही काळ तनावाची स्थिती निर्माण झाली. मात्र पोलिसांनी स्थिती नियंत्रणात आणली दुपार नंतर त्यांना सोडून देण्यात आले.
माजरीच्या इतिहासात आजपर्यंतची सर्वात मोठी कारवाई असून या कारवाईला पडद्यामागून वेकोलि प्रशासनाचा कारस्थान असल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे.
सदर कारवाई दुपार पर्यंत सुरु होती. या कारवाईत रेल्वे प्रशासन अत्यंत गरीब परिस्थितीत जगण्यासाठी संघर्ष करणाऱ्या नागरिकांना बेघर करून यश प्राप्त केले आहे.

अतिक्रमणच्या कारवाईदरम्यान उपविभागीय पोलिस अधिकारी आयुष नोपानी, माजरीचे ठाणेदार विनीत घागे, सपोनि अजितसिंग देवरे, पो.नि.पाटील ठाणेदार बल्लारशाह, पो.नि.पारधी नियंत्रण कक्ष चंद्रपुर, सपोनि किटे, पोउनि बेलसरे वरोरा, सपोनि वर्मा भद्रावती, मसपोनि राजुरकर, आगलावे,पोउनि सरोदे आरपीएफचे आशुतोष पांडे डीएससी, कोटा जोजी एएससी, के.एन. राय इंस्पेक्टर चंद्रपुर यांच्यासह पाच इंस्पेक्टर, आठ सबइंस्पेक्टर उपस्थित होते.

जनतेवर झालेल्या अन्यायाविरुद्ध हा लढा आहे. रेल्वे प्रशासनाने पोलिस बलाचा प्रयोग करून नजरबंद केले आहे.जनतेला न्याय मिळवून देण्याकरिता तुरुंगात जावे लागेल तरी चालेल. मात्र हा लढा यापुढेही सुरु राहणार.
-प्रवीण सुर, माजी जि.प.सदस्य

सदर कारवाई नियमानुसार करण्यात आली. रेल्वे भूखंडावरील अतिक्रमण हटवून रेल्वेने आपल्या मालकीची जागा ताब्यात घेतली आहे. अतिक्रमणाची जागा खाली करण्याची मोहीम सकाळी ७ वाजेपासून करण्यात आली. सदर कारवाईदरम्यान कोणतीही अनुचित प्रकार घडू नये याकरिता चोख बंदोबस्त ठेवण्यात आला. हि कारवाई शांततेत व सुरळीत पार पडली असून प्रत्यक्ष-अप्रत्यक्षरित्या नागरिकांचा सहकार्याबद्दल सर्वांचे आभार.
-विनीत घागे, ठाणेदार, माजरी