
प्रतिनिधी:- श्री चेतन एस. चौधरी
नंदुरबार:- आयटीआयचा शेवटचा पेपर देण्यासाठी निघालेल्या तरुणीचा अपघातात मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. शेवटचा पेपर देऊ आणि घरी आनंदात जाऊ, असे स्वप्न डोळ्यांत साठवत महाविद्यालयीन तरुणी आपल्या मित्रांसोबत मोटारसायकलवरून पेपरला निघाली होती. मात्र वाटेतच कंटेनरने दिलेल्या धडकेत तिचा जागीच मृत्यू झाला.
नंदुरबार जिल्ह्यातील नवापुर तालुक्यात ही धक्कादायक घटना घडली आहे. सुमन गावित असं मृत झालेल्या तरुणीचे नाव आहे. नवापूर तालुक्यातील वडखुट गावाची रहिवाशी असलेली सुमन गावित आयटीआयमध्ये शिक्षण घेत होती. गुरूवारी तिचा शेवटचा पेपर होता. पेपर देण्यासाठी ती आपल्या मित्रांसह दुचाकीवरून कॉलेजला निघाली होती. नवापुर तालुक्यातील नवी सावरट गावाजवळ आल्यानंतर भरधाव वेगाने येत असलेल्या कंटेनरने त्यांचा दुचाकीला धडक दिली. ही धडक इतकी भीषण होती की, सुमन आणि तिचा मित्र महामार्गावर फेकले गेले.
अपघातात सुमनच्या अंगावरून कंटेनरचे चाक गेल्याने तिचा जागीच मृत्यू झाला. तर तिचा मित्र गंभीर जखमी झाला. दरम्यान, अपघाताची माहिती मिळताच महामार्गावर मोठी नागरिकांनी मोठी गर्दी केली. सुमन आणि तिच्या मित्राला स्थानिक नागरिकांनी तातडीने रुग्णालयात दाखल केले. मात्र रुग्णालयात जाण्याअगोदरच सुमनची प्राणज्योत मावळली होती. तर जखमी अवस्थेत असलेल्या तिच्या मित्रावर नवापूर उपजिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहे. आपली लाडकी लेक पेपर देऊन घरी येणार अशी स्वप्न पाहणाऱ्या सुमनच्या कुटुंबीयांना अचानक तिच्या निधनाची बातमी कळली. यावेळी नवापुर उपजिल्हा रुग्णालयात सुमनच्या नातेवाईकांनी मोठा आक्रोश केला.
