गतिमान, लोकाभिमुख प्रशासनाच्या मानवीय चेहऱ्याची संकटकाळात अनुभूती {अपरिमित वित्तीय हानी, जीवितहानी मात्र टळली }

राळेगाव तालुका प्रतिनिधी-रामभाऊ भोयर (9529256225)

  

शासकीय कामं अन सहा महिने थांब’ प्रशासनाचा हा अनुभव सर्वसामान्य माणसाला नवा नाही. गतिमान लोकाभिमुख प्रशासनाचा कितीही डांगोरा पिटल्या जात असला तरी प्रत्यक्ष ग्राउंड लेव्हल वर मात्र जे घडते ते फारसे काही समाधानकारक असतं नाही. राळेगाव तालुक्यात संततधार पावसाने न भूतो न भविष्यती अशी अपरिमित हानी झाली. या वेळी मात्र प्रशासनाने आपल्या कामकाजात जी तत्परता दाखवली ती या गृहीतकाला छेद देणारी ठरली. प्रशासनाचा हा मानवीय चेहरा मोठा लोभसवाणा भासावा असा अनुभव या दरम्यान आला. महसूल प्रशासनाने यात सर्वाधिक चांगले कामं करून जनतेला दिलासा दिला.
रामगँगा, वर्धा नदी व नाल्याना प्रचंड पूर आल्याने तब्बल 11 गावात पाणी शिरले. 10 हजार हेकटर मधील पीक पाण्याखाली बुडले. एकाचं दिवशी 147 मी. मी. पावसाची नोंद झाली. जिल्हयात ही आकडेवारी सर्वाधिक होती. या भीषण स्थितीत सर्वात आधी ज्या गावात पाणी शिरले तेथील नागरिकांना सुरक्षितस्थळी हलविणे हा प्राधान्यक्रम ठरवून तहसीलदार डॉ. रवींद्र कानडजे यांनी विविध पथके तयार केली. यात नायब तहसीलदार, मंडळअधिकारी, तलाठी, ग्रामसेवक, पोलीस पाटील, कोतवाल यांच्या कडे जबाबदारी निश्चित करण्यात आली. पूरग्रस्त गावातील नागरिकंना स्थानिक शाळा, समाज मंदिर, उंचवट्याच्या जागी हलविण्यात आले. त्यांच्या जेवणाची, पिण्याच्या पाण्याची जशी जमेल त्या माध्यमातून सोय करण्यात आली. ज्या गावांना पुराचा वेढा पडला होता त्या ठिकाणच्या नागरिकांना बोटी द्वारे सुरक्षितस्थळी हलविण्यात आले.
या वेळी परिस्थिती गँभीर होती. तालुक्यातील उंदरी गावाला पाण्याचा वेढा पडला होता. राळेगाव वर्धा मार्ग बंद होऊन रामतीर्थ गावात पाणी शिरले होते. नागठाणा गुजरी गावा पर्यंत पाणी आले होते. रावेरी गावात पाणी शिरले. मेंघांपुर गावाला पाण्याचा वेढा पडला. पिंळखुटी, असेल वरुड असेल वा सावंगी अथवा एकबुर्जी किंवा भांब अनेक गावात पाणी शिरले. प्रत्येक ठिकाणी प्रशासनाला पोहचण्या करीता मनुष्यबळ त्या वेळी मिळणे दुरापास्त होते. उपलब्ध कर्मचाऱ्यांना कार्यप्रवण करून प्रशासनाने अतिशय उत्कृष्ट समानव्याने स्थिती हाताळली. जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी तत्परतेने भेट देऊन प्रशासनाला गतिमान केले. उपविभागीय अधिकारी शैलेश काळे ही सर्व मंडळी ग्राउंड लेव्हल वर कामं करतांना दरम्यान च्या काळात दिसतं होती. राळेगाव तालुक्यात या प्रचंड पुराच्या प्रकोपात जीवितहानी झाली नाही याचे श्रेय प्रशासनाच्या या गतिमान नियोजनाला व नागरीकांच्या सहकार्याला द्यावे लागेल.
आज पूर ओसरलेला आहे. अनेक संसार मोडून पडले आहे. शेतकऱ्यांच्या, कष्टकऱयांच्या संसारात आधीच दुःखाखेरीज दुसरा ऐवज नसतो. या पुराणे होते नव्हते धान्य, कपडालत्ता, व राहत्या घरालाच लक्ष केले. घरंही वाहून गेलें, शेती ही खरडून नेली. पिके पाण्याखाली दबली. अपरिमित नुकसान या पेक्षा वेगळा शब्द या साठी नाही. मात्र शेतकऱ्यांनी प्रत्येक संकटाला तोंड दिल्याचा इथला इतिहास आहे.फक्त ‘ मोडून पडला संसार तरी मोडला नाही कणा, पाठीवरती हात ठेऊन फक्त लढ म्हणा, हा धीर देणारे कुणी तरी संकटकाळात असणे आवश्यक असते. राळेगाव तालुक्यातील प्रशासनाने ते कामं या वेळी केले. तहसीलदार डॉ. रवींद्र कानडजे यांनी सर्व पातळीवर या दरम्यान उत्कृष्ट कामं करून संवेदनशीलतेचा परिचय दिला. असे म्हटल्यास अतिशयोक्ती ठरणार नाही.