मुलबाळ होत नसल्याच्या कारणावरून विवाहितेची हत्या..?,’१४ जुलैची घटना ; पोलीसांचा तपासही संशयास्पद..!’

ढाणकी/प्रतिनिधी
मुलबाळ होत नसल्याच्या कारणावरून ३२ वर्षीय विवाहितेची हत्या केल्याची खळबळजनक घटना ईसापूर येथे घडली असून घटनेेेला तब्बल १२ दिवस झाल्यानंतरही पोलीसांकडून कार्यवाहीची प्रक्रीया अत्यंत संथ गतीने होत असल्याने पोलीसांच्या कार्यप्रणालीवरच थेट प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहेत…

यवतमाळ जिल्हा उमरखेड तालुक्यातील मौजे ढाणकी येथील मयत यास्मीन परवीन वय ३२ वर्षे हिचा विवाह पुसद तालुक्यातील मौजे ईसापूर येथील शेख फारूख शेख शादुल वय ३५ वर्षे याच्यासोबत मागील ११ वर्षांपुर्वी झाला होता. परंतू लग्नाला ११ वर्षे होवूनही मुलबाळ होत नसल्याकारणाने तसेच वारंवार पैशाच्या मागणीसाठी मृतकाचा नवरा शेख फारूक शेख शादूल वय ३५ याच्यासह शेख रऊफ शेख शादूल वय ३२, शेख सरदार शेख शादूल वय ३८, जाकेराबी शेख शादूल तसेच नव-याच्या दोन बहीणी ह्या नेहेमीच मयत यास्मीनचा मानसिक छळ करीत असल्याची तक्रार मृतकाचा भाऊ फिरोज खान बुडन खान वय २५ वर्षे याने खंबाळा पोलीस ठाण्यात दि. १५ जुलै २०२२ रोजी दिली आहे.

विशेष म्हणजे मृतक यास्मीनला नेहेमीच वांझोटी, वांझ या अपमाणीत करणा-या संबोधनासोबतच वारंवार हुंड्याची मागणी व केली जात असलेली मारहाण या त्रासामुळे व्यथित होवून यास्मीनने सासरच्या मंडळीविरूध्द विद्यमान न्यायदंडाधिकारी प्रथम श्रेणी उमरखेड यांच्या न्यायालयात फौजदारी मुकदमा नं १०/२०२२ अन्वये पती शे.फारूक शे. शादूल, जाकेराबी शे. शादूल, शे. सरदार शे.शादूल, फरहाना शे. सरदार, शे. रऊफ शे. शादूल, समीना शे. रऊफ, शाहिन परवीन शे. शादूल व मालन परवीन शे. शादूल यांच्याविरूद्ध मृतक विवाहितेने कौटुंबिक हिसाचाराची तक्रारही दाखल केली होती. त्यात सासरच्या मंडळींनी कोर्टाबाहेर आपसी तडजोड करून तिला नांदण्यास नेले होते..

दरम्यान दि. १४ जुलै २०२२ रोजी सायंकाळी ६ वा. च्या दरम्यान सासरच्या मंडळींनी फोनद्वारे माहिती दिली की, यास्मीनबी पडल्यामुळे तिचे निधन झाले आहे.. त्यामुळे माहेरच्या मंडळीने तातडीने ईसापूर गाठून घडला प्रकार पाहिल्यानंतर मृतक यास्मीनचा मृतदेह पलंगावर टाकलेल्या अवस्थेत आढळून आला. तसेच तिला पडल्यासारखी कोणतीही खून दिसून आली नाही. त्यामुळे तिला सासरच्या मंडळींनी मारून टाकले असल्याचा संशय अधिकच बळावल्याने मृतकाचा भाऊ फिरोज खान बुडन खान वय २५ वर्षे रा. ढाणकी ता. उमरखेड याने मृतकाचे शवविच्छेदन सुरू असताना दि. १५ जुलै २०२२ रोजी खंडाळा पोलीस ठाण्यात वरील सासरच्या मंडळीविरूद्ध तक्रार देवून गुन्हा दाखल करण्याची मागणी केली होती. परंतू घटनेला आज (दि. २६ जुलै) पर्यंता तब्बल बारा दिवस लोटून गेल्यानंतरही खंडाळा पोलीस मात्र ‘सायलेंट मोडवर’ असल्याने घटनेची तपासचक्रे सध्यातरी एकाच ठिकाणावर आराम घेत असून खंडाळा पोलीसांकडून होत असलेल्या या अक्षम्य दिरंगाईमुळे पोलीसांच्या कार्यप्रणालीवरच प्रश्नचिन्ह उपस्थित होत असून पोलीसांकडून केला जात असलेला तपास फक्त वेळकाढू स्वरूपाचा असल्याचेही मृतक यास्मीनच्या माहेरच्या मंडळीने सांगीतले आहे…