वडकी ग्रामीण रुग्णालयाची मंजुरी हवेत, लोकप्रतिनिधीची उदासीनता, वडकीवासियांचा अपेक्षा भंग?

राळेगाव तालुका प्रतिनिधी रामभाऊ भोयर

राळेगाव विधानसभा क्षेत्राचे विद्यमान आमदार तथा तत्कालीन आदिवासी विकास मंत्री प्राचार्य डॉ. अशोकराव उईके यांनी सप्टेंबर 2019 मध्ये वडकी येथे 30 खाटांचे ग्रामीण रुग्णालय मंजूर केले. त्या मंजूरीनंतर तत्कालीन ग्रामपंचायतीने शासकीय जागा सुद्धा उपलब्ध करून आरोग्य विभागाचे ताब्यात दिली.परंतू 2022चा जुलै महिना संपला, 4 वर्षांचा कालावधी झाला तरी अजून पर्यंत बांधकाम झाले नाही सोबतच पदांना सुध्दा मंजुरी मिळाली की नाही याची शंका आहे? वडकी हे गाव नॅशनल हायवे रोडला लागून असल्यामुळे आणि रोडवर जागोजागी मोठमोठे खड्डे पडले असल्याने सतत अपघात होतात. अपघातग्रस्ताना तात्काळ आरोग्य सेवा उपलब्ध होत नाही.अपघाताच्या मालिकेमुळे पोलीस विभाग चिंताग्रस्त आहे. वडकी हे आजूबाजूच्या गावातील लोकांचे बाजारपेठेचे मुख्य केंद्र असल्याने अनेक प्रकारचे पेशंट येथे येतात. वडकी येथील खाजगी दवाखाने रात्री 9 नंतर बंद झाल्यावर हिंगणघाट जि. वर्धा किंवा यवतमाळ शिवाय रुग्णांना पर्याय नाही.गोरगरीबांना हे परवडणारे नाही.या वर्षी सतत पाऊस पडल्यामुळे साथीचे आजार लागण्याची शक्यता नाकारता येत नाही. पावसाळा असल्याने विंचू दंश,सर्पदंश तसेच पिसाळलेल्या कुत्र्यांचा हैदोस असते.करीता आजच्या परिस्थितीचा विचार करून,वडकी व परिसरातील जनतेचा विचार करून श्री. कुणाल भास्कर केराम व इतर गावकरी तसेच परिसरातील नागरिकांनी शासकीय ग्रामीण रुग्णालयाचे बांधकाम होईपर्यंत “विश्राम गृह” वडकी येथे ओपीडी (बाह्यरुग्ण विभाग) सुरू करून जनतेला या संकटातून बाहेर पडण्यासाठी शल्य चिकित्सक यवतमाळ यांचेकडे अर्ज पाठवला असून त्याच्या प्रती मा.आमदार राळेगाव, मा. जिल्हाधिकारी यवतमाळ, मा. तहसीलदार राळेगाव तसेच वडकी येथील मा. सरपंच,मा.उपसरपंच,मा.सर्व सदस्य गण या पदाधिकाऱ्यांना पाठविले आहे. स्वातंत्र्याच्या 75 वर्षानंतरसुध्दा वडकी व परिसरातील जनता आरोग्य सेवेपासून वंचित आहे. आरोग्य सेवे सारख्या महत्वपूर्ण जीवनावश्यक बाबीकडे आजपर्यंत जाणूनबुजून दुर्लक्ष करण्यात येत आहे.जनतेच्या सेवेसाठी जनतेनी निवडून दिलेले लोकप्रतिनिधी जनतेला दिलेल्या आश्वासनाकडे दुर्लक्ष करून आश्वासनांची पूर्तता न करता दुर्लक्षित करीत असेल तर जनतेनी निवडून दिलेले लोकप्रतिनिधी कशासाठी ? असा असा सवाल वडकी व परिसरातील जनता करीत असून निवडणूकीच्या वेळी मतदारांना गोड बोलून मत हासिल करणारे लोकप्रतिनिधी बहिरेपणाचे सोंग घेऊन कानावर हात ठेवून बसले असून लोकप्रतिनिधीबद्धल मतदारांमध्ये उदासीनता दिसून येत असून वडकी विभागातील मतदारांचा अपेक्षाभंग झाला आहे. नुकत्याच जिल्हा परिषद, पंचायत समितीच्या निवडणूका जवळ आल्या असताना हे मतदार या लोकप्रतिनिधींना आपली जागा दाखविणार असल्याची वडकी परिसरात खमंग चर्चा सुरू असून या विभागातील जबाबदार अधिकाऱ्यांनी जनतेसाठी आरोग्य खात्याची बाह्यरुग्ण सेवा (ओपीडी)सुरू करून दिलासा द्यावा अशी मागणी करण्यात येत आहे.त्यासाठी वडकी व परिसरातील नागरिक जन आंदोलनाच्या तयारीत आहे.