
बालाजी भांडवलकर (जिल्हा प्रतिनिधी)
संपूर्ण भारतभर उत्साहात साजरा होत असलेले 2022 हे वर्ष अमृत महोत्सवी वर्ष म्हणून साजरे होत आहे अमृत महोत्सवी दिनाचे औचित्य साधून वाटेफळ येथील देश सेवेमध्ये भारतीय सैन्यदल ,नौदल पोलीस मित्र परिवारांच्या वतीने जिल्हा परिषद प्राथमिक शाळा येथील गुणानुक्रमे शालेय विद्यार्थ्यांना डिजिटल पॅडसह खाऊचे वाटप लष्करातील जवानांचे हस्ते करण्यात आले, तसेच बालाजी एंटरप्राइजेस अँड वेल्ड व जय हनुमान माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय वाटेफळ यांच्या संयुक्त विद्यमानाने भारतीय सैन्यदल पोलीस दलातील उपस्थित जवानांचा शाल श्रीफळ फेटा बांधून सन्मान करण्यात आला.
देशाच्या स्वातंत्र्यासाठी शेवटच्या श्वासापर्यंत इंग्रजांशी लढाई लढून हुतात्म पत्काणाऱ्या महापुरुषचे बलिदान आपण कधीही विसरू शकत नाही त्यांच्याबद्दल प्रत्येकाच्या मनामध्ये आदरची भावना ओतप्रोत भरलेली आहे.राष्ट्रपुरुषांचे विचार नेहमीच प्रेरणादायी आहेत. असे मत विद्यार्थ्यांच्या देशभक्तीपर भाषणे, निबंध काव्यांच्या माध्यमातून उजळल्याने अवघा परिसर देशभक्तीमय झाला .
स्वतंत्र भारतामध्ये आजही मुली महिला हुंडाबळी तसेच कौटुंबिक हिंसाचाराच्या बळी पडत आहेत त्यांना मुक्त स्वतंत्र असा निर्भीडपणे मोकळा श्वास जेव्हा मिळेल तेव्हा खऱ्या अर्थाने आपला देश स्वतंत्र होईल असे मत विद्यार्थिनी कु. अश्विनी लांडे हिने व्यक्त केले.
शालेय जीवनामध्ये इतर बाह्य गोष्टीकडे विचलित न होता आपल्या निश्चित ध्येयापर्यंत पोहोचण्यासाठी अभ्यासावर लक्ष केंद्रित केले पाहिजे .आमचा सन्मान आम्ही ज्या ठिकाणी तुमच्यासमोर आहोत हीच जागा उद्या तुमची वाट पाहत आहे . त्यासाठी जिद्द चिकाटी आणि नियमित परिश्रम हवे असे प्रेरणादायी मार्गदर्शन जवानांनी विद्यार्थ्यांना केले.
देशाची सेवा करण्यासाठी धडपडत असणाऱ्या वाटेफळ व परिसरातील नवतरुणांना प्रोत्साहित करण्यासाठी “जय शिवराय भरतीपूर्व प्रशिक्षण केंद्र” व गावातील भारतीय सैन्य दल पोलीस मित्र परिवारांच्या वतीने भरतीपूर्व सराव करणाऱ्या तरुणांना मोफत शूजचे शिक्षक व मान्यवरांच्या हस्ते वाटप करण्यात आले.
ऐतिहासिक अशा स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी दिनानिमित्त राष्ट्रीय तिरंगी ध्वजाला मानवंदना देण्यासाठी शिक्षक, शिक्षकेत्तर कर्मचारी वृंद ,अंगणवाडी सेविका कर्मचारी ,शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष सदस्य ,आरोग्य कर्मचारी ,आशाताई ,पोलीस पाटील तसेच विविध संस्थेचे पदाधिकारी कर्मचारी, सरपंच उपसरपंच सदस्य , देशप्रेमी महिला पुरुष पत्रकारसमवेत मोठ्या प्रमाणात उपस्थित होते.
