दुर्देवाचे दशावतार आमच्याच भाळी का यावे [ अस्मानी व सुलतानी संकटाच्या मालिकेने राळेगाव तालुका हादरला ]

राळेगाव तालुका प्रतिनिधी-रामभाऊ भोयर

     

संकट येतं तेव्हा ते चहुबाजूनी येतं असं म्हणतात, त्यातही शेती व शेतकरी यांच्या मागे संकटांचा ससेमिरा हात धुऊन लागल्याची बाब आता नवी राहिली नाही. राळेगाव तालुक्यावर मात्र यंदा अस्मानी व सुलतानी संकटाने चांगलाच कहर निर्माण केला. संकटाची जणू मालिका या तालुक्यातील गोर -गरीब शेतकरी, कष्ट्करी यांच्या वाट्याला आली, एव्हाना येतं आहे. अतिवृष्टी, पूर, सहा शेतकऱ्यांच्या आत्महत्या , शेतकरी पती -पत्नी चा नाल्याच्या पुरात वाहून मृत्यू व आता ऐन पोळ्याच्या दिवशी दोन शेतकऱ्यांचा गाळात फसून दुर्देवी मृत्यू या घटनानी समाजमन हादरले आहे.
यंदा सरासरी पेक्षा अधिक पाऊस कोसळणार हा हवामान खात्याचा अंदाज खरा ठरला मात्र मान्सून लवकर दाखल होणार हा अंदाज फोल ठरला. या मुळे दुबार पेरणीची सलामी हंगामाच्या सुरवातीलाच निसर्गाने दिली. यातून सावरत नाही तोच अतिवृष्टी ने झोडपून काढले. 17 जुलै पासून संततधार पावसाने जे भयावह रूप दाखवले त्याने होत्याचे नव्हते झाले. राळेगाव तालुक्यातील तब्बल 11 गावे पाण्याखाली गेली. 12 हजार हेकटर वरील पिके खरडून गेली. प्रचंड नुकसान या पुराने शेतकऱ्यांचे झाले.
या आघातांची सुरुवात झाली कापशी येथून. रामतीर्थ येथे पेंटिंग करायला गेलेली दोन तरुण मुलं कामं सम्पल्यानंतर आंघोळ करण्यास कापशी येथील नदी पात्रात उतरली. रेती तस्करांनी उपसा केलेल्या खड्यांचा अंदाज न आल्याने त्यांचा नदीत बुडून मृत्यू झाला. त्या नंतर शेती हंगाम सुरु होताच अतिवृष्टी ने आपले रोद्र रूप दाखविणे सुरु केले. राळेगाव तालुक्याला यंदा दोनदा पुराचा फटका बसला. नापिकीचे स्पष्ट संकेत जुलै महिन्याच्या अखेरीस दिसू लागले. या नंतर सुरु झाले आत्महत्येचे सत्र. तालुक्यातील सहा शेतकऱ्यांनी अतिवृष्टी नंतर च्या महिन्याभरात आपली जीवनयात्रा सम्पवण्याचा निर्णय घेतला. विशेष म्हणजे आत्महत्या केलेले शेतकरी हे 25 ते 40 या वयोगटातील आहेत. अर्थात या तरुण शेतकऱ्यांच्या आत्महत्या आहेत. हे घडतं असतांनाच वरुड येथे पुराच्या दुसऱ्या टप्प्या दरम्यान तलावा पलीकडे शेताची राखण करण्यास गेलेल्या शेतकरी पती-पत्नी चा परत गावात येतं असतांना नाल्याच्या पुरात बुडून मृत्यू झाला. या मृत्यूला सुलतानी वेवस्था देखील जबाबदार असल्याची किनार आहे. वरुड येथील नागरिकं|नी अनेकदा या तलावालगत संरक्षण भिंत बांधण्याची मागणी केली पण त्या कडे दुर्लक्ष करण्यात आले.
( दि. 26) ऐन पोळ्याच्या दिवशी सरई येथील दोन शेतकरी बैलजोडी धुण्यासाठी लगतच्या शेततळे सदृश ठिकाणी गेले असता. गाळात फसून त्यांचा मृत्यू झाला. इथला प्रकार तर अधिक गँभीर आहे. ज्या ठिकाणी हे शेतकरी बुडून मृत्युमुखी पडले त्या ठिकाणी नदी वा नाला नाही तर बेंबळेच्या कामाकरीता या ठिकाणावरून मुरूम खोदून टाकण्यात आला. त्याचा खड्डा पडला हा खड्डा तब्बल एक एकरात आहे. यात पाणी भरले याच ठिकाणी हे दोन शेतकरी बैल धुण्यासाठी गेलें. व मृत्यूच्या फेऱ्यात सापडले.
वरील विविध दुर्देवी घटना यंदा राळेगाव तालुक्याच्या वाट्याला आल्या आहे. हे वर्ष सर्व बाजूनी तालुक्यासाठी संकटाचे ठरतांना दिसते. जिल्ह्यात सर्वाधिक पावसाची नोंद राळेगाव तालुक्यात झाली. सर्वाधिक नुकसान देखील राळेगाव तालुक्याचे झाले. आता शेतकरी, कष्ट्करी यांच्या मृत्यूच्या घटनात देखील तालुका आघाडीवर असल्याने संकटांच्या मालिकेचे दशावतार आमच्याच भाळी का असा सवाल जनतेला पडला आहे. मात्र याचे उत्तर कुणाकडेच नाही हे वास्तव अस्वस्थ करणारे आहे . राजा उदार झाला व हाती भोपळा दिला असे होऊ नये
अतिवृष्टी नंतर विरोधी पक्ष नेते ना. अजितदादा पवार यांनी राळेगाव तालुक्यातील विविध नुकसानग्रस्त भागाची पाहणी केली. शासनाला आर्थिक मदत देण्यासाठी बाध्य करू अशी ग्वाही त्यांनी दिली. त्या उपरांत राज्याचे कृषी मंत्री अब्दुल्ल सत्तार यांनी नियोजित दौऱ्याच्या आदल्या दिवशीच राळेगाव तालुका गाठला व धावती भेट देतं ओके म्हणून गावं सोडले . या त्यांच्या हुलकावणीची चांगलीच चर्चा तालुक्यात रंगली. ऑगस्ट महिन्याच्या अखेरीस राज्यात अतिवृष्टी, पूर याने नुकसान झालेल्याना मदतीचा शासनादेश निर्गमित झाला. पावसाळी अधिवेशनात अधिवेशन सम्पल्याबरोबर शेतकऱ्यांच्या खात्यात मदत येईल असे आस्वासन सत्ताधार्यांनी दिले. मात्र मदत किती मिळणार या बाबत शेतकऱ्यांच्या मनात शांशकता आहे. गावात पाणी शिरल्याने अनेकांच्या घरांचे प्रचंड नुकसान झाले. तर दुसरीकडे उभे पीक देखील खरडून गेलें असे शेकडो शेतकरी आहेत. सरसकट मदतीची मागणी सातत्याने होतं आहे. माय बाप सरकारची घोषणा राजा उदार झाला व हाती भोपळा दिला या स्वरूपाचे लबाडाचे आमंत्रण ठरू नये अशी प्रतिक्रिया वेक्त होतांना दिसते.