
राळेगाव तालुका प्रतिनिधी-रामभाऊ भोयर
सद्य परिस्थितीत पुढे होत असलेल्या निवडणुका पूर्वी मतदान कार्डशी आधार लिंकचे काम सुरू आहे. मात्र ह्या आधार लिंकिंग च्या कामासाठी शाळेच्या शिक्षकांचा वापर सर्रास सुरू आहे. एकंदरीत तालुक्यातील व इतरही परिस्थिती पाहता आधीच शाळेत शिक्षक कमी असताना शिक्षकांना आधार लिंकिंग चे काम देऊन शासनाने गरीब विद्यार्थ्यांना वाऱ्यावर सोडले आहे.
खेड्यापाड्यातील गरीब सर्वसामान्य कुटुंबातील विद्यार्थी हा परस्थिती मुळे जिल्हा परिषद शाळेत शिक्षण घेणे पसंत करतो. त्यातल्या त्यात गरीबाच मरण हेच शासनाचे धोरण आहे की काय तर प्रत्येक जिल्ह्यात जवळपास जिल्हा परिषद शाळांमध्ये शिक्षकांचा खूप तुटवडा आहे. प्रत्येक शाळेत विद्यार्थ्यांची पटसंख्या असूनही शिक्षक अपुरे आहेत. तसेही जिल्हा परिषद शाळेत एक शिक्षक दोन ते तीन वर्गांना शिकवितो कारण नवीन शिक्षक भरती न झाल्यामुळे शिक्षक अपुरे आहेत. परंतु निवडणुका किंवा इतर कोणत्याही शासकीय कामांमध्ये शासनाकडून शिक्षकांचा वापर केला जातो. त्यामुळे शिक्षकांनी शिकवावे की इतर कामे करावे हा यक्ष प्रश्न आहे.
शिक्षक मतदानाची आधार लिंकिंग चे काम करत असताना शाळेत विद्यार्थ्यांना शिकवणार कोण? कदाचित खेड्यापाड्यातील गरीब विद्यार्थी हा शिकून पुढे जाऊच नाही असे तर शासनाचे धोरण नाही? असा प्रश्न सर्वसामान्यांना पडत आहे. शिक्षक शाळेत नाही राहिले तर गरीब विद्यार्थ्यांचे खूप नुकसान होणार याची शासनाला कल्पना नाही का? खेड्यापाड्यातील गोरगरीब कुटुंबातील विद्यार्थी शिकू नये असे तर शासनाचे धोरण नाही? त्यामुळे शिक्षकांना शिक्षणाचेच काम करू द्यावे, अशी मागणी पालकांतून होत आहे.
