
ढाणकी
प्रती /प्रवीण जोशी
पांढरकवडा वन्यजीव वनविभाग, पैनगंगा अभयारण्य वनपरिक्षेत्र यांच्यावतीने जिल्हा परिषद केंद्रीय उच्च प्राथमिक शाळा बिटरगाव बुद्रुक येथे चित्ता या भारतात नामशेष झालेल्या प्राण्याविषयी माहिती व जनजागृती कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
चित्ता हा प्राणी सन 1952 सालापासून भारतातून नामशेष झालेला आहे. पृथ्वीवरील सर्वात वेगवान प्राणी म्हणून त्याची ओळख असून तासी 115 किलोमीटर या वेगाने धावतो. हा प्राणी मांजर कुलातील असून गवत परिसंस्था हा त्याचा अधिवास आहे. भारतात मोठ्या प्रमाणात होणारी शिकार हेच या प्राण्याचे नामशेष होण्याचे मुख्य कारण असल्याचे यावेळी वन अधिकाऱ्यांनी बोलताना सांगितले.
पुढच्या पिढीला चित्ता प्राणी कसा होता हे चित्रात न दिसता प्रत्यक्षात दिसावे व भारतातही त्याचा वावर असावा या उद्देशाने भारत सरकारने दिनांक 17 सप्टेंबर 2022 ला आफ्रिकेच्या जंगलातून भारतातील मध्य प्रदेश राज्यातील कुनो राष्ट्रीय उद्यान येथे चित्ते खास विमानाने आणले. त्यामुळे पुढील पिढीला चित्ता हा प्राणी नेमका कसा होता हे यातून दिसणार आहे.
वन्यजीवांचे संरक्षण करणे व संवर्धन करणे गरजेचे आहे त्यामुळे अन्नसाखळीचा समतोल राखला जाईल असे मत वनरक्षक प्रकाश पाईकराव यांनी बोलताना व्यक्त केले. तर आता या प्राण्या विषयी संपूर्ण माहिती वैभव घोरपडे यांनी विद्यार्थ्यांना दिली. विशेष म्हणजे शाळेचे कृतिशील शिक्षक म्हणून ओळख असलेले शेख शफी यांनी ऑर्गमेंटेड रियालिटी चा वापर करून प्रांगणात आभासी चिता आणून दाखवला.
हा कार्यक्रम वनपरिक्षेत्र अधिकारी चंद्रशेखर भोजने यांच्या मार्गदर्शनात पार पडला. यावेळी वनरक्षक सिद्धार्थ सावळे, प्रवीण तांबे, सिद्धार्थ जोंधळे, बाबासाहेब ठोंबरे, शेषराव चव्हाण, संजय दवणे, जिल्हा परिषद शाळेचे मुख्याध्यापक आनंद यमजलवार, नरसिंग आयतलवाड इत्यादी उपस्थित होते.
