केंद्रीय विद्यालयाचे कंत्राटीकरण थांबवा.. अन्यथा येत्या दोन दिवसात आंदोलन

नाशिक केंद्रीय विद्यालय (आय.एस.पी नेहरुनगर) येथे परिक्षा काळात तब्बल १० शिक्षकांची बदली करून कंत्राटी स्वरूपात शिक्षक रुजू करण्याची प्रक्रिया सुरू झाली असल्याने विद्यार्थ्यांचे मोठे शैक्षणिक नुकसान होणार आहे. छात्रभारती विद्यार्थी संघटनेच्या वतीने निवासी उपजिल्हाधिकारी मा.भागवत डोईफोडे यांची शिष्टमंडळाने भेट घेऊन चर्चा केली आणि निवेदन देण्यात आले.

कोरोना लॉकडाऊन काळात मोडुन पडलेल्या शिक्षणाला नवसंजीवनी देण्याची गरज असताना, केंद्र सरकारने नाशिक येथील केंद्रीय विद्यालयाच्या शिक्षकांची परराज्यात तडकाफडकी बदली केल्याने सदर काळात सुरू असलेल्या विद्यार्थ्यांच्या परिक्षा आणि शिक्षणाचा वार्षिक चौरस साधण्याचा हा काळ आहे, अशा परिस्थितीत विद्यालयातुन शिक्षक कमी करुन त्याठिकाणी कंत्राटी पद्धतीने शिक्षक रुजू करण्याचा केंद्र सरकारचा हा कुटील डाव आहे, केंद्रीय विद्यालयाच्या विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान थांबविण्यासाठी तातडीने शिक्षकांची बदली थांबवावी अशी समस्त पालकांची मागणी असुन कंत्राटी शिक्षकांना कुठलेही प्रशिक्षण नसल्याने सदर विद्यालयात शिक्षण घेणा-या विद्यार्थ्यांची गुणवत्ता ढासळण्याची ही चिन्ह दिसत आहेत.

केंद्रीय विद्यालय आय.एस.पी नेहरुनगर येथील विद्यालयातील कायमस्वरूपी असलेल्या शिक्षकांची परराज्यात तडकाफडकी बदली करून कंत्राटी पद्धतीने शिक्षक रुजू होत असतील तर ह्या कंत्राटीकरणाचा छात्रभारती विद्यार्थी संघटना निषेध व्यक्त करत आहे, तातडीने कंत्राटीकरण थांबवा अन्यथा येत्या दोन दिवसात समस्त विद्यालयातील सर्व विद्यार्थी आणि पालक यांच्यासह ठिय्या आंदोलनाला सुरुवात करण्यात येणार आहे.

यावेळी छात्रभारतीचे राज्य कार्याध्यक्ष समाधान बागुल, शहराध्यक्ष देविदास हजारे, रोशन वाघ, स्वरुप पिसे, विनोद लोखंडे, स्नेहा लोखंडे, दत्ताजी जाधव, शोभना जगताप, आरती जाधव आणि वनिता कडवाल उपस्थित होते.